लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात अनेक समस्या असल्याने या समस्यांचा सामना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. सोयीसुविधांच्या अभावामुळे येथील बहुतांश रुग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक कमालीचे त्रस्त आहेत.छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला धानोरा तालुका विस्ताराने बराच मोठा आहे. या तालुक्यात खासगी रुग्णालये व डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथील जनतेच्या आरोग्याची मदार केवळ ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्ण सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेतो. त्याची प्रकृती थोडी चिंताजनक वाटल्यास त्याला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले जाते. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची नेहमीच गर्दी राहते. सध्या दमट वातावरण निर्माण झाले असल्याने दुर्गम भागात मलेरिया व इतर रोगांचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे. या ठिकाणी केवळ ३० खाटांची व्यवस्था आहे. मात्र रुग्ण ५० च्या जवळपास असल्याने रुग्णांना वऱ्हांड्यात खाली गादीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयात एक्स-रे मशीन आहे. मात्र केवळ दोनच दिवस एक्स-रे काढले जातात. त्यामुळे रुग्णांना परत जाऊन ज्या दिवशी एक्स-रे काढले जातात, त्यादिवशी परत यावे लागते. वैद्यकीय अधीक्षकाचे एक पद, औषधी निर्मात एक पद, सहायक अधीक्षक एक पद, एक्स-रे टेक्निशियन एक पद यासारखे अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयाची इमारत खूप जुनी आहे. त्यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी स्लॅब गळते. त्यामुळे पावसाचे पाणी रुग्णालयात जमा होते. लाखो रूपये खर्चुन सौरऊर्जा सयंत्र बसविण्यात आला आहे. तो सुद्धा बंद आहे. नातेवाईकांसाठी खा.नरेश पुगलिया यांच्या निधीतून धर्मशाला बांधण्यात आली. तिचा वापर आता भंगार साहित्य ठेवण्यासाठी केला जातो. धर्मशाळा नेहमी बंदच राहते. परिणामी नातेवाईकांना बाहेरच किंवा रुग्णालयाच्या वऱ्हांड्यात थांबावे लागते.रुग्णालयात साहित्य व यंत्र यांचा अभाव असला तरी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे, डॉ.जांभुळे, डॉ.खोब्रागडे, डॉ.सीमा गेडाम, डॉ.लेपसे व इतर कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असलेले यंत्र उपलब्ध करून द्यावे, तसेच रिक्तपदे भरावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.रुग्णांची संख्या वाढलीदमट वातावरणामुळे ग्रामीण व दुर्गम भागात मलेरिया, ताप व इतर साथीच्या रोगांचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील १५ दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी बेड उपलब्ध असल्याने रुग्णांना खाली गादीवर झोपवून उपचार घ्यावे लागत आहेत. अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला द्यावा लागतो. दुर्गम भागातील रुग्णांना गडचिरोलीसारख्या शहरात राहून उपचार घेणे गैरसोयीचे होते. परिणामी काही रुग्ण गडचिरोली येथे जाण्याऐवजी घरी परतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.
धानोराचे रुग्णालय समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:36 AM
धानोरा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात अनेक समस्या असल्याने या समस्यांचा सामना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. सोयीसुविधांच्या अभावामुळे येथील बहुतांश रुग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो.
ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : रिक्त पदांचा भार; खाली झोपून घ्यावे लागत आहे उपचार