रखडलेल्या बसस्थानक कामाकडे धर्मरावबाबांनी वेधले सदनाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:06 AM2021-03-13T05:06:56+5:302021-03-13T05:06:56+5:30
अहेरी : उपविभागातील आलापल्ली, सिरोंचा आणि अहेरी येथील बसस्थानकांचे काम निधीअभावी रखडलेले आहे. यासंदर्भात आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत ...
अहेरी : उपविभागातील आलापल्ली, सिरोंचा आणि अहेरी येथील बसस्थानकांचे काम निधीअभावी रखडलेले आहे. यासंदर्भात आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून रखडलेल्या कामाकडे सदनाचे लक्ष वेधले. यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन दिले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी बसस्थानक, आलापल्ली व सिरोंचा बसस्थानकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या कामाला २०१८ मध्ये सुरुवातसुद्धा झाली होती. मात्र, त्यानंतर निधीअभावी बसस्थानकांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे १० महिन्यांत पूर्ण होणाऱ्या कामाला लॉकडाऊन व कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विलंब झाला. त्यामुळे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न सदनात उपस्थित करून लक्ष वेधले. अतिदुर्गम मागास क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आ. आत्राम यांनी विधानसभेत केली. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी येत्या वर्षाच्या अंदाजपत्रकात निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर ही रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने निधी देणार असल्याचे सांगितले.