गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे परिणामी वाॅर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेत समावेश आहे. त्यामुळे या नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटी सोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास, चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवर ही ती नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. येथे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे राेगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने लक्ष घालून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
तंमुसला प्रशिक्षण द्या
रांगी : अनेक गावामध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र, समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्य प्रकारे साेडवण्यास मदत हाेईल.
नियमांचे उल्लंघन
देसाईगंज : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. हल्ली उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई केली नाही.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहन चालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे, शिवाय त्याचा व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.