गडचिरोली : अहेरी, कोरची, गडचिरोली तालुक्यात साथ रोगांनी थैमान घातल्याने शेकडो नागरिक तापाने फणफणत आहेत. मात्र याकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गावाला लागूनच धानाच्या बांध्या राहतात. बांध्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास वाढते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डास आढळून येतात. त्याचबरोबर गावाकाठी असलेल्या जंगलामुळेही डासांची पैदास वाढते. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हे प्रशासन व गावकऱ्यांसमोरील मोठे आवाहन बनले आहे. डासांमुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांची साथ पसरते. सिरोंचा तालुक्यातील कंबलपेठा परिसरात मलेरियाची साथ पसरली आहे. कंबलपेठा येथील १० वर्षीय रमनय्या करके गावडे या ब्रेन मलेरिया रोगाने मुलाचा मृत्यू झाला. त्याला मागील काही दिवसांपासून ताप येत होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जिमलगट्टा येथील रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोरची तालुक्यातही मलेरियाची साथ पसरली आहे. कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात मलेरियाचे दहा रूग्ण भरती झाले आहेत. तसेच इतर आजारांचे रूग्णसुद्धा आहेत. जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर व पंचायत समिती सभापती अवधराम बागमुळ यांनी २८ आॅक्टोबर रोजी कोरची येथील ग्रामीण रूग्णालयास भेट दिली असता, बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. मागील दहा दिवसांपासून रूग्णांना भोजन मिळत नसल्याची माहिती रूग्णांनी दिली. दवाखान्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रूग्णांना दवाखान्याबाहेर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागते. रूग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वॉर्डबॉय, परिचारीकांची पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळणे कठीण झाली आहे. ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहेत. त्यांच्याकडे इतरही कामाचा बोजा आहे. त्यामुळे ते रूग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ देऊ शकत नाही. येथील कर्मचारी नियमितपणे हजर राहत नसल्याने अशा कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. कोरची ग्रामीण रूग्णालयाप्रमाणेच जिल्ह्यातील इतरही रूग्णालयांची हिच परिस्थिती असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात साथ रोगांचे थैमान
By admin | Published: October 30, 2014 10:52 PM