ऋषिपंचमीच्या व्रताला यंदा कोरोना संसर्गाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:00 AM2021-09-11T05:00:00+5:302021-09-11T05:00:31+5:30
कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरितालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रिया सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत दरवर्षी ठेवतात. हरितालिका गौरी व्रताच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत ठेवले जाते. दरवर्षी विदर्भाची काशी मार्कण्डेश्वर देवस्थान या धार्मिक स्थळी हे व्रत वैनगंगा नदीच्या तीरावर केले जाते. या वर्षी ११ सप्टेंबरला ऋषिपंचमी व्रत आहे. मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने हा ऋषिपंचमी व्रत करणाऱ्या महिलांना या व्रतापासून मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरितालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. शास्त्रातील मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे व्रत शुद्ध मनाने केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते. या वर्षी ऋषिपंचमी शनिवार ११ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचा दिवस व्रत ठेवण्यासाठी फलदायक असतो. पौराणिक मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्यास त्यांना सुख-शांती आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सुहासिनी स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या दिवशी गंगास्नानाचेही महत्त्व असते. महिला या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती व समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते आणि पंडितांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करण्यात येते. अविवाहित स्त्रियांसाठीही हे व्रत महत्त्वपूर्ण व फलदायी मानले जाते दरवर्षी मार्कडा देव येथे वैनगंगा तीरावर वसलेले मार्कण्डेश्वर मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्र स्थळी ऋषिपंचमी व्रत केले जाते मात्र यावर्षीही हे व्रत महिलांना कोरोनामुळे करता येईल की नाही ही शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ऋषिपंचमी दिनी मार्कंडास्थळी चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून याबाबत तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत.
सण-समारंभ साजरा करताना गर्दी होऊन कोराेना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे धार्मिक स्थळी भाविकांना प्रवेश करण्यास तसेच धार्मिक पूजा करण्यास मनाई करण्याबाबत सूचना आहेत.
मंदिरात गर्दी करू नका
- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात जमावबंदी लागू असून कोणत्याही प्रकारचे धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम करता येणार नाहीत. यानुसार तहसीलदार चामोर्शी यांच्याकडून व चामोर्शी पाेलिसांकडून मार्कंडादेव मंदिराजवळ बंदोबस्त उभारण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी किंवा मंदिर प्रवेशासाठी बंदी घालण्यात आलेली असून नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.