संघटनेद्वारेच दारूमुक्ती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:46 AM2019-06-13T00:46:02+5:302019-06-13T00:46:35+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे. आणि त्यासाठी महिला व पुरुषांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी केले.
सिरोंचा येथे मुक्तिपथद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. तेलुगू भाषिक लोकांशी डॉ. राणी बंग यांनी तेलुगूतच साधलेला संवाद नवी प्रेरणा देऊन गेला. तालुक्यापासून दूरवर असलेल्या ७२ गावातील मुक्तिपथ गाव संघटनेचे ३२७ महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी हजर होते. याप्रसंगी मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहायक पोलीस निरीक्षक पतंगराव पाटील, सुनंदा खोरगडे उपस्थित होत्या.
अनेक महिलांनी यावेळी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी दिलेला लढा सर्वांसमोर मांडला. पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी महिलांना आश्वासन दिले. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील आहेत. महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
संमेलनात खर्रा सेवनाने होणारे दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा चित्रपट दाखविण्यात आला. भावी पिढी तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आसरअल्ली जि. प. शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांच्या ‘तंबाखूमुक्त पाठशाला’ या पुस्तकाचे विमोचन डॉ. राणी बंग यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
संचालन मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी केले. यशस्वीतेसाठी तालुका मुक्तिपथ संघटक सुनीता भगत, उपसंघटक महेंद्र सदनपू आणि प्रेरक संतोष चंदावार यांनी सहकार्य केले.
आठवड्यात सोमवारी व्यसन उपचार क्लिनिक
व्यसन हा आजार आहे. त्यावर उपचार शक्य असल्याने दारूची सवय सोडण्याची इच्छा असलेल्या व्यसनींवर उपचारासाठी सिरोंचा येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १७ जूनपासून व्यसन उपचार क्लिनिक सुरू होत आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हे क्लिनिक राहणार असून येथे व्यसनींवर उपचार होणार आहे.