रेल्वे स्थानकावर सीडबॉलचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:12 AM2019-07-12T00:12:01+5:302019-07-12T00:12:48+5:30
कुरखेडा व देसाईगंज वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीडबॉलचे (डब्बा) वाटप करून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कुरखेडा व देसाईगंज वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीडबॉलचे (डब्बा) वाटप करून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली.
माती, शेणखत, रेती व आॅर्गेनिक कम्पोस्ट यांचे मिश्रण तयार करून त्यामध्ये आवळा, सिताफळ, जांभूळ, आंजन, फणस, कडूनिंब, चिंच, करंज, बेल यासारख्या विविध प्रजातीच्या बियाणे टाकून सीडबॉल तयार केले. सदर सीडबॉल गोंदिया, चंद्रपूर रेल्वेमधील प्रवाशांना वाटप करण्यात आले. देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी हरितसेनेच्या विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व सीडबॉलचे महत्त्व समजावून सांगितले. सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे, उपविभागीय वनाधिकारी सुनील कैदलवार, कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, देसाईगंजचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांनीही प्रवाशांना सीडबॉलबाबत मार्गदर्शन केले.
हरिसेनेचे विद्यार्थी व वनकर्मचारी यांचा गट तयार करून प्रत्येक बोगीतील १५ ते २० प्रवाशांना सीडबॉलचे वितरण करण्यात आले. सीडबॉल हे धावत्या रेल्वेतून मार्गाच्या दुतर्फा फेकण्यास सांगितले.
पाणी साचलेले ठिकाण, नदी, नाले या ठिकाणी सीडबॉल न फेकण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमासाठी आदर्श कला, वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक हेमंत सरदारे, रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभाकर भोंडे यांच्यासह देसाईगंज व कुरखेडा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.