जिल्हा न्यायालयाचा गडचिरोली रॉयल्स संघ विजेता
By admin | Published: March 10, 2016 02:06 AM2016-03-10T02:06:19+5:302016-03-10T02:06:19+5:30
गडचिरोली जिल्हा न्यायालय फिरते चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी व सोमवारी घेण्यात आली.
टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा समारोप : जिल्हा सत्र न्यायाधीश ठरले ‘मॅन आॅफ दी मॅच’चे मानकरी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा न्यायालय फिरते चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी व सोमवारी घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा न्यायालयाचा गडचिरोली रॉयल्स संघ विजयी ठरला. या संघाला फिरते चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे हे ‘मॅन आॅफ दी मॅच’ पुरस्काराचे मानकरी ठरले.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष बोरावार, जिल्हा शासकीय अधिवक्ता प्रधान, पोलीस उपअधीक्षक एस. पी. कवडे, माजी न्यायाधीश म्हशाखेत्री उपस्थित होते.
रविवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश, वकील, कर्मचारी यांनी देशभक्ती, भावभक्ती गीत सादर करून लावणी व इतर गीत सादर केले. अॅड. प्रकाश भोयर यांनी गोंडीनृत्य सादर केले. क्रिकेट सामन्याला पंच म्हणून प्रा. म्हस्के, पोलीस निरीक्षक विठ्ठल मुत्तेमवार, संजय शेरगिरे, किशोर पंचभाई तर गुणलेखक व समालोचक म्हणून देवेंद्र गडपल्लीवार व राजू जाधव यांनी काम पाहिले. त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेट सामने व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत अनेक वकील मंडळींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. (स्थानिक प्रतिनिधी)