उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:23 AM2018-11-17T01:23:30+5:302018-11-17T01:24:18+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षीचा जिल्हा गौरव पुरस्कार देसाईगंज तालुक्याच्या विसोरा येथील राकेश धनंजय नाकाडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते राकेश नाकाडे यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख ५१ हजार रूपये देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, जि.प. सदस्य संपत आळे, भाग्यवान टेकाम, भारत बावणथडे, हैदरभाई पंजवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या सांस्कृतिक वारसाचे फलित म्हणून प्रकाशरंग पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी प्रकाशरंग या पुस्तकाचे संपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार अरविंद पोरेड्डीवार यांनी मानले.