लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : केंद्रात सत्तेत असलेला पक्ष जातीयवादाला खतपाणी देऊन तो वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्रिपुरात घडलेल्या मस्जिद प्रकरणावरून नांदेड, अमरावती, मालेगाव या भागात हिंसाचार उफाळून आला. माणसामाणसांत दरी निर्माण करणाऱ्या पक्षाला खतपाणी घालू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केले. गुरुवारी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल, माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी जि.प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाग्यश्री आत्राम, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, ऋतुराज हलगेकर, माजी मंत्री रमेश बंग, नाना पंचबुद्धे, राजू कारेमोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, प्रवीण कुंटे पाटील, श्रीकांत शिवणकर, जगदीश पंचबुद्धे, माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना देशाची लोकसंख्या ३५-४० हजार कोटींच्या घरात होती. आजमितीस देशाची लोकसंख्या १२५ कोटींच्या पुढे गेली आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक शेतजमीन प्रकल्पाखाली जात आहेत. त्यामुळे विकासासंबंधी अनेक समस्या निर्माण होत आहेत. गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या विकासासंबंधीही अनेक समस्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खऱ्या आदिवासींची ओळख नाही. अधिवेशन काळात त्यांनी वनवासी म्हटलेले आहे. परंतु महाराष्ट्रातील आदिवासी मूळ निवासी आहेत. या आदिवासी व गैरआदिवासींसाठी केंद्राने वेगळ्या निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र वासेकर यांनी, तर संचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.
आर्थिक स्थिती बिकट असतानाही शेतकऱ्यांना मदतकेंद्र सरकारकडून २४ हजार कोटी येणे आहेत. गेलेल्या कोरोनाकाळात राज्यावर आर्थिक परिस्थितीचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्यांचे कर्ज कमी करण्यासाठी सरकार जागृत आहे. आघाडी सरकार बोललेला शब्द पाळणार आहे. कर्ज वेळेत भरणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह ५० हजारांचे अनुदान टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यास बळ- यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, देशाच्या शेतकऱ्यांना शरद पवारांसारखा नेता लाभलेला आहे. भारतातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे ते देशाचे पहिले कृषिमंत्री ठरले. आम्ही पूर्व विदर्भात २०२१ पासून धानाला २५०० रुपये भाव देऊन दोन्ही वर्षात ७०० रुपये बोनस दिलेला आहे. आज माजी आमदार स्व. शामराव पाटील कापगते यांचे नातू, आमदार इंदूताई यांचे चिरंजीव नाना नाकाडे हे भाजपमधून आमच्या पक्षात आल्याने नक्कीच आमच्या पक्षाचे या जिल्ह्यातील बळ वाढलेले आहे. नाकाडे यांचा प्रवेश हा मुरब्बी राजकारणी घराण्याच्या नेत्याचा प्रवेश आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यास बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाना नाकाडे राष्ट्रवादीच्या तंबूत- यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा विद्यमान सदस्य नाना नाकाडे यांनी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांनी प्रतिसाद देत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमाला कोरचीपासून तर सिरोंचापर्यंतचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाेकसभेसाठी धर्मरावबाबांचे नाव निश्चितयावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आपण अनेक वर्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तिकीटवर आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकूनही आलाे. अजून किती दिवस मला आमदारच ठेवणार, आता लाेकसभेवर पाठवा, अशी इच्छा आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली. नाना नाकाडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थिती मजबूत झाली असून या भागातून सदस्य निवडून आल्यास जिल्हा परिषदेवर पक्षाची सत्ता बसेल, असा विश्वास व्यक्त केला.धर्मरावबाबा यांच्या भाषणाचा धागा पकडत शरद पवार यांनी तुम्हाला नक्कीच लाेकसभेवर पाठवू, त्याबद्दल निश्चिंत राहा, अशी ग्वाही दिली. तसेच अहेरी विधानसभेसाठी भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना तिकीट देऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे आघाडी कायम राहिल्यास गडचिराेली-चिमूर लाेकसभा मतदार संघ काॅंग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.