कमलापूर (गडचिराेली) : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे नक्षल बॅनर लावणाऱ्या तीन नक्षल समर्थकांना रेपनपल्ली पाेलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व दाेन रूग्णवाहिका चालकांचा समावेश आहे.
डाॅ. पवन उईके, प्रफुल्ल भट्ट, अनिल भट्ट अशी आराेपींची नावे आहेत. यातील डाॅ. पवन उईके हे मुळचे गाेंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते मागील दाेन वर्षांपासून कमलापूर प्राथमिक आराेग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत हाेते. तर प्रफुल्ल देवानंद भट्ट व अनिल गाेकुलराज भट्ट हे कमलापूर येथील रहिवासी आहेत. दाेघेही दवाखान्याच्या रूग्णवाहिकेचे चालक आहेत.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताहाचे आवाहन केले हाेते. यानिमित्त कमलापूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या परिसरात गुरूवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास डाॅ. उईके व अन्य दाेघे हे नक्षल बॅनर लावत हाेते. त्याचवेळी गस्तीवर असलेले पाेलीस त्या ठिकाणी पाेहचले. तिघांनाही अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आठ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
याचदरम्यान एक रेशन दुकानदार कमलापूरवरून चारचाकी वाहनाने नागेपल्ली येथे जात हाेता. पाेलिसांना त्याच्या विषयी सुध्दा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले हाेते. मात्र त्याचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला साेडून दिले.
स्वयंखुशीने की नक्षल्यांचा डाॅक्टरवर दबाव?
अहेरी तालुक्यातील कमलापूर हे गाव एकेकाळी नक्षल्यांचा गड मानले जात हाेते. याच ठिकाणी असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्रात दाेन वर्षांपूर्वी डाॅ. पवन उईके यांची नियुक्ती झाली. त्यांनी एमबीबीएसचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने नक्षल बॅनर लावण्याचा गुन्हा केला आहे. हे काम करण्यासाठी नक्षलवाद्यांचा त्याच्यावर दबाव हाेता. त्याने स्वयंखुशीने हे काम स्वीकारले, असा प्रश्न आहे. ही बाब पाेलीस तपासात पुढे येईल.