भारिपतर्फे डॉ. आंबेडकर भवन तोडफोड प्रकरणाचा निषेध
By admin | Published: June 26, 2016 01:11 AM2016-06-26T01:11:33+5:302016-06-26T01:11:33+5:30
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची बुलडोजर लावून काही लोकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.
गडचिरोली : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची बुलडोजर लावून काही लोकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ व बौध्द महासभेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकात माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
यावेळी भारिप बमसचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, भारीप बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, बाळू टेंभुर्णे, प्रा. प्रकाश दुधे, सिताराम टेंभुर्णे, सुरेखा बारसागडे, माला भजगवळी, रामकृष्ण बांबोळे, दर्शना मेश्राम, अनिल बारसागडे, ठेमस्कर, मिलिंद अंबादे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. निषेध आंदोलन सुरू होताच १० मिनिटात गडचिरोली पोलीस इंदिरा गांधी चौकात पोहोचले व त्यांनी भारिपच्या पदाधिकाऱ्यांना वाहनात बसवून ठाण्यात नेले. जवळपास अर्धा तास कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)