सात वर्षांपासून नालीतील गाळ उपशाला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:41+5:30
रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम येथील पोलीस कॉलनीमधील नाल्यांमधील गाळाचा उपसा गेल्या सहा ते सात वर्षांपासून न झाल्याने नाल्या गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
राजाराम येथील पोलीस कॉलनीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. पावसाळा सुरू झाला असल्याने दुर्गंधीही वाढली. बहुतांश नाल्यांमध्ये प्लास्टिक बॉटल्स, कॅरिबॅग, काडीकचरा, दगड भरून आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते. परंतु याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने उपसा झाला नाही. केंद्र व राज्य शासनातर्फे दरवर्षी स्वच्छता व आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते. यासाठी विशेष निधीही दिला जातो. अनेक ग्राम पंचायती वर्षभर स्वच्छता मोहीम राबवितात. परंतु राजाराम ग्रा. पं. याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा
राजाराम ग्राम पंचायत अंतर्गत गावातील नाल्यांमधील गाळाचा उपसा दरवर्षी केला जात नाही. संपूर्ण गावातील गाळाचा उपसा तीन ते चार वर्षानंतर केला जातो. पोलीस कॉलनीतील गाळ उपसा सात वर्षापासून झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सचिव व प्रशासक गाळाचा उपसा करण्याकडे कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वारंवार सूचना देऊनही ग्राम पंचायतीला जाग आली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नाल्यांमधील गाळाचा उपसा करून त्याची विल्हेवाट न लावल्यास ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा राजाराम वासीयांनी दिला आहे.
राजाराम ग्राम पंचायतीने नाल्यांमधील गाळा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मार्च महिन्यापासून सरपंच पद रिक्त झाल्यानंतर पं. स. च्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. ग्राम सचिव व प्रशासक यांना गाळ उपसा करण्याबाबत सूचना दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गाळ उपशाचे काम सुरू होईल.
- भास्कर तलांडे, सभापती
पं. स. अहेरी