गडचिराेली : स्थानिक जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गाेहणे यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्याच शाळेला ३५ नेत्यांची रेखाचित्रे भेट दिली आहेत.
मुख्याध्यापक सुधीर गाेहणे यांचा दहा वर्षांपूर्वी अपघात झाला हाेता. या कालावधीत त्यांनी एक महिन्याच्या आजारी रजा घेतल्या हाेत्या. दिवसभर घरीच राहावे लागत असल्यामुळे कंटाळवाणे वाटत हाेते. त्यांना नवाेदय विद्यालयात असतापासूनच चित्रकलेची आवड हाेती. मात्र कामाच्या व्यापामुळे त्यांचे या कलेकडे दुर्लक्ष झाले हाेते. वैद्यकीय रजांच्या कालावधीत त्यांनी सुमारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी झटणाऱ्या नेत्यांची तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ३५ नेत्यांची रेखाचित्रे रेखाटली. भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट राेजी ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्यांनी सर्व ३५ रेखाचित्रांना फ्रेम करून ही रेखाचित्रे शाळेला भेट दिली. त्यांच्या या अनाेख्या कार्याचे काैतुक हाेत आहे.