एटापल्ली : एटापल्ली येथे ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे आहेत. त्याचबरोबर गढूळ पाण्याचे डबके असल्याने यामधून निर्माण झालेल्या दुर्गंधीचा त्रास एटापल्लीवासीयांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आदिवासींच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी गोटूलची निर्मिती एटापल्ली येथे करण्यात आली. एटापल्ली येथे उभारण्यात आलेले एकमेव गोटूल असून येथे विविध शासकीय व खाजगी कार्यक्रम होतात. परंतु गोटूल परिसरात पाण्याची डबकी व घाणीचे साम्राज्य असल्याने गोटूल परिसरात असणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोटूलला लागूनच बोअरवेल आहे. बोअरवेलच्या पाण्यामुळे परिसरात खड्डे पडून डबके निर्माण झाले आहेत. परंतु पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गोटूलच्या समोरच महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा असून याला लागूनच बोअरवेल आहे. परिसरातील नागरिक बोअरवेलचे पाणी भरत असल्याने वाया गेलेले पाणी पुतळ्याच्या समोर साचून राहते. साचलेल्या पाण्यात डुक्कर व इतर जनावरे बसून राहत असल्याने घाण सर्वत्र पसरली आहे. या परिसरात शहीद पोलीस शिपाई श्रीनिवास दंडीकवार यांचे स्मारक आहे. या स्मारकासमोर नेहमीच कचर्याचे ढिगारे साचून असतात. गोटूलला लागूनच मटन मार्केट आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असते. परिसरातील दुकानदार व इतर नागरिक गोटूल परिसरातच कचरा फेकत असल्याने कचर्याच्या साम्राज्यात आणखीच वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गोटूल परिसरात कचराकुंडी ठेवावी व या कचर्याची नियमित उचल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाच्या पाण्याने कचरा कुजून दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या घाणीमुळे एटापल्लीवासीयांचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीत घाणीचे साम्राज्य
By admin | Published: May 19, 2014 11:32 PM