पावसाअभावी शेतजमिनीला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:31+5:30
आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/चामोर्शी : जुलै महिन्यात देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. जोरदार पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडत असून रोवणी झालेले शेतजमिनीला भेगा पडत आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचे बजेट यावर्षी कोलमडले आहे. पीक कर्ज व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पीक लागवडीचा आतापर्यंतचा खर्च बºयाच शेतकºयांनी केला आहे. या दोन्ही तालुक्यात धानपीक रोवणीचे काम ४० टक्क्याच्या आत आहे. रोवणी झालेल्या शेताला सुद्धा पाणी नसल्याने हे पीक धोक्यात आले आहे. शेतातील बांध्या पूर्णत: कोरड्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतजमिनीला भेगा पडत आहे. छोटी-मोठी सिंचन सुविधा असलेले शेतकरी मोटारपंप व विहिरीच्या माध्यमातून शेताला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र पावसाळ्याच्या सुरूवातीपासूूनच कृत्रिम पाणीपुरवठा करावा लागत असल्याने यावरील विद्युत बिल व इंधनाचा खर्च शेतकºयांच्या माथी पडणार आहे. परिणामी यावर्षीची धानाची शेती पूर्ण तोट्याची होणार आहे.
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी नहरामार्फत शेतजमिनीला सोडण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातही रेगडी येथील कन्नमवार धरणाचे पाणी नहराद्वारे सोडण्यात आले आहे.
रोवणीसाठी सोडले रेगडी धरणाचे पाणी
पाऊस बरसत नसल्याने चामोर्शी तालुक्यातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहे. दरम्यान ही बाब बºयाच शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी नहरामार्फत सोडण्यासंदर्भात शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर १ जुलै रोजी आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत जलपूजन करून दिना धरणाचे पाणी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे उपस्थित होते. दिना धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने काही शेतकऱ्याचे रोवणीचे काम सुरू झाले आहे. मात्र उपकालव्याला पाणी न सोडल्याने चामोर्शीलगतच्या शेतातील रोवणीचे काम अजूनही ठप्प पडले आहे. उपकालव्याला पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.