गडचिरोली : राज्यकर्त्यांनी ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केल्याने हा वर्ग राज्यकर्त्यांवर बराच संतापला होता. निवडणुकीच्या माध्यमातून आपला संताप दाखवून दिल्याने राज्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाले असल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. ओबीसींची जनगणना, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न, ओबीसी, शेतकरी, शेतमजून यांना नाकारण्यात आलेले वनहक्काचे पट्टे, घरकूल योजना, विशेष घटक योजना आरक्षण कमी झाल्यामुळे वाढलेली बेरोजगारी, पदोन्नतीमध्ये ओबीसी कर्मचार्यांवर होणार अन्याय यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात आघात झाला आहे. या समस्या सोडविण्यासाठी ओबीसी संघटनांनी १२ वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केलीत. मात्र केंद्र व राज्य शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या आंदोलनांची खिल्ली उडविण्यात आली. सदर आंदोलन एका विशिष्ट वर्गापूरत्याच मर्यादित असून ग्रामीण भागातील ओबीसी जनता आपल्या पाठीशी असल्याच्या अर्विभावात राज्यकर्ते मंडळी वावरत होती. मात्र ग्रामीण भागातील नागरिकसुध्दा आता जागृत झाले आहेत. शासनाने केलेल्या अन्यायाचे दुष्परिणाम ते भोगत असल्याने राज्यकर्त्यांना मत देणे शक्यच नव्हते. शासनाच्या विरोधात असलेला संताप सुप्त स्वरूपात असल्याने राज्यकर्त्यांना तो दिसला नाही. ५० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाने राज्यकर्त्यांच्या विरोधात मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येत्या सहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी ओबीसींचे प्रश्न मार्गी न लावल्यास विधानसभेतसुध्दा पानिपत होण्याची शक्यता प्रा. शेषराव येलेकर यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)
ओबीसींमुळे राज्यकर्त्यांचे पानिपत
By admin | Published: May 18, 2014 11:36 PM