गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी रविवारी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ते दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. प्रथमच सरकारचा कोणी मंत्री संवाद साधण्यासाठी या परिसरात आल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून या संवेदनशील परिसराचा दौरा केला.
जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी दूर असलेल्या छत्तीसगडच्या सीमेवरील पातागुडम या गावी एकनाथ शिंदे रविवारी पोहोचले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या गावी वीज पोहोचली. ऐम कावाले (काय पाहिजे), मंचिगा उंदा (बरं आहे काय?) असे त्यांच्या भाषेत आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका मुलाने एसटीतील भरती निवड रखडल्याचा मुद्दा मांडला. तर शिंदे यांनी नक्षलपीडित दोन कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंघला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.तसेच शिंदे यांनी सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाची पाहणी केली. तसेच पातागुडम पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफ व बीएसएफ जवानांच्या वसतिगृहाची आणि कॅन्टीनची पाहणी करून या जवानांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली.