हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:56+5:30

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली.

Elephant herd destroys 10 acres of grain | हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सतत चार दिवसांपासून पिकांची नासाडी करीत असलेल्या हत्तींनी सोमवारी (दि.२९) रात्री परिसरातील सर्वांत मोठे नुकसान केले असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली. परंतु यावर कोणतीही उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपिक व कडधान्यांचे नुकसान कसे थांबवावे, ही मोठी गंभीर समस्या झाली आहे. या जंगली हत्तींच्या कळपापासून पिकांचे रक्षण करणे सध्यातरी वनविभागाच्या आवाक्याबाहेर झाले आहे.
गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली. बुद्धे हे रात्री आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शेतानजीक पाहणी करण्यासाठी गेले असता हत्तीच्या आवाजाने त्यांना तसेच माघारी फिरावे लागले. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन बघितले असता धान कापून त्यांचे पुंजने करून ठेवलेल्या ठिकाणी हत्तींनी धिंगाणा घातला होता. पुंजण्यांचे नुकसान केले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने पंचनामे करून तशी मदत शासनाकडून मिळवून देऊ, असे सांत्वन केले.

शेतकऱ्यांची उडाली झोप
चार महिने शेतात मेहनत करून हाताशी आलेले धानपीक आता विक्रीसाठी तयार होत आहे. अशात परिसरात हत्तींचा कळप आल्याने तो कधी आपल्या शेतात येईल व शेतमालाचे नुकसान करून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी झोप उडाली आहे. हे संकट दूर करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नसून आता परिसरातील शेतकरी वनविभागावरच विश्वास ठेवून आहेत. लवकरात लवकर या संकटातून मुक्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हिजन व ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच तीन पथक तयार केले आहेत. त्यात एक पथक सतत हत्तींच्या मागावर राहून देखरेख करते. दुसरे पथक नागरिकांमध्ये जनजागृती करते तर तिसरे पथक पंचनामे करून अहवाल सादर करते. 
- धर्मवीर सालविठ्ठल, विभागीय वनअधिकारी, देसाईगंज

 

Web Title: Elephant herd destroys 10 acres of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.