अखेर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:21+5:30
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली येथे आयोजित कराव्यात, असे मत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांचे होते. तर तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अजय कंकडालवार यांना या स्पर्धा आलापल्ली येथे पार पडाव्यात, असे वाटत होते. दोन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये ठिकाणावरून मतभेद होते. त्यामुळे मागील दोन वर्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्याच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वादात सलग दोन वर्ष जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा तसेच पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा होऊ शकल्या नाही. यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलल्याने क्रीडा स्पर्धांचा मार्ग मोकळा झाला. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा संकूल आलापल्ली येथे जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली येथे आयोजित कराव्यात, असे मत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांचे होते. तर तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अजय कंकडालवार यांना या स्पर्धा आलापल्ली येथे पार पडाव्यात, असे वाटत होते. दोन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये ठिकाणावरून मतभेद होते. त्यामुळे मागील दोन वर्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्याच नाही.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया २० दिवसांपूर्वी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अजय कंकडालवार तर उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती म्हणून मनोहर पोरेटी यांची निवड झाली. तत्कालीन शिक्षण सभापती आता जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्याने त्यांच्या मतानुसार यावर्षीच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे आयोजित केल्या जाणार आहेत. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धा पार पडणार आहेत. दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. तालुकास्तरावर विजेते पद पटकावलेल्या संघांना जिल्हास्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांनाही त्यांच्यातील कौशल्य दाखविता येणार आहे. त्यामुळे कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी खेळांचा सराव करण्यास सुरूवात केली आहे.
२४० संघांचा सहभाग
१२० विद्यार्थ्यांचे संघ व १२० अधिकारी, कर्मचारी यांचे संघ असे एकूण २४० संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. तालुकास्तरावर विजेतेपद पटकावलेल्या प्राथमिक व माध्यमिक गटातील मुल व मुलींचे कबड्डी व खो-खोचे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून १० संघ याप्रमाणे १२० विद्यार्थ्यांचे संघ राहणार आहेत. तसेच कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांच्यासाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, कॅरम, क्रिकेट या पाच प्रकारच्या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक खेळाचे महिला व पुरूष कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी एक संघ याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून पाच खेळांचे १० संघ सहभागी होणार आहेत, असे एकूण १२० संघ सहभागी होतील. वैयक्तिक खेळांमध्ये १०० व २०० मीटर दौड स्पर्धा आयोजित केली आहे.
सांस्कृतिक स्पर्धांमध्ये समुह गाण, सामुहिक नृत्य, एकल नृत्य, नाट्यछटा किंवा नकल आदींचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी सुमारे आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सदर निधी अपुरा ठरण्याची शक्यता आहे.
असे आहे क्रीडा स्पर्धेचे नियोजन
४ फेब्रुवारी रोजी सर्व खेळाडूंचे आलापल्ली येथे आगमण होईल. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता खेळाडूंचे वजन व उंचीचे मोजमाप, ८ वाजता संचालन, १० वाजता उद्घाटन, १२ वाजता उद्घाटनीय सामना, दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत विश्रांती, २.३० ते ४.३० वाजेपर्यंत सांघिक खेळ, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ७ ते ८.३० वाजेपर्यंत भोजन होईल. ६ व ७ फेब्रुवारी रोजी सामने होतील. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समारोपीय कार्यक्रम व बक्षीस वितरण होईल.
आलापल्ली हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. खेळाच्या दृष्टीने आलापल्ली येथे सर्वच सोयीसुविधा आहेत. कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थ्यांच्या राहण्याचीही व्यवस्था योग्य पध्दतीने होणार आहे. त्यामुळेच आलापल्ली हे ठिकाण क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहे.
- अजय कंकडालवार, अध्यक्ष,
जिल्हा परिषद गडचिरोली