उशिरापर्यंत जमा झाल्या इव्हीएम मशीन
By admin | Published: February 17, 2017 01:18 AM2017-02-17T01:18:59+5:302017-02-17T01:18:59+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गुरूवारी मतदान पार पडले. सर्वाधिक ८२.०८ मतदान कुरखेडा तालुक्यात झाले.
कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक मतदान : दुर्गम भागातून पोलिंग पार्टी पोहोचण्यास झाली सायंकाळ
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गुरूवारी मतदान पार पडले. सर्वाधिक ८२.०८ मतदान कुरखेडा तालुक्यात झाले. तर सर्वात कमी मतदान ५७.३८ टक्के मतदान चामोर्शी तालुक्यात झाले. दुपारी ३ वाजता मतदान संपले. मात्र धानोरा, कोरची, कुरखेडा, मुलचेरा आदी तालुक्यातून पोलिंग पार्ट्या पोलीस संरक्षणात आणण्यासाठी बराच वेळ गेला. रात्री उशिरापर्यंत या पोलिंग पार्ट्या तालुका मुख्यालयात पोहोचल्या. त्यामुळे तहसील कार्यालयस्तरावर मतदानाची अंतिम आकडेवारी दूरध्वनीवरूनच घेण्यात आली होती. त्यानुसार कोरची तालुक्यात २४ हजार ८८ मतदारांपैकी १८ हजार ६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ७५.०३ टक्के मतदान झाले.
कुरखेडा तालुक्यात एकूण ५२ हजार ७४० मतदारांपैकी ४३ हजार २८९ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ८२.०८ आहे. देसाईगंज तालुक्यात ४० हजार २८१ मतदारांपैकी ३२ हजार ८२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथील टक्केवारी ८१.४८ आहे. आरमोरी तालुक्यात ५५ हजार ३८३ मतदारांपैकी ४३ हजार ४५ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ७८.१० आहे. धानोरा तालुक्यात एकूण ४८ हजार ६६१ मतदारांपैैकी ३४ हजार ६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ७१.११ टक्के मतदान झाले.
चामोर्शी तालुक्यात १ लाख १९ हजार ३४२ मतदार संख्या आहे. यापैकी गुरूवारी ६८ हजार ४८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथील टक्केवारी ५७.३८ आहे. मुलचेरा तालुक्यात एकूण ४३ हजार ८३८ मतदारांपैकी २३ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले. येथील टक्केवारी ७९.२० आहे.
गडचिरोली तालुक्यात ७२.१४ टक्के मतदान
गडचिरोली तालुक्यात एकूण ६६ हजार ४३६ मतदार आहेत. एकूण १०३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यंत ७२.१४ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदारांपैकी ४७ हजार ९४२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २४ हजार ८४५ महिला मतदार व २३ हजार ९७ पुरूष मतदारांची संख्या आहे. सदर आकडेवारी अंदाजीत असून यामध्ये बदल होण्याची शक्यता गडचिरोलीचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी दिली आहे.
कोरची तालुक्यात ७५.०३४ टक्के मतदान
कोरची तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणासाठी आज मतदान पार पडले. एकूण २४ हजार ८१ मतदारांपैकी १८ हजार ६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. १२ हजार ४५४ मतदारांपैकी ९ हजार ३०४ पुरूष व ११ हजार ६२७ स्त्री मतदारांपैकी ८ हजार ७६५ मतदारांनी मतदान केले. एकूण ७५.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कोरची यांनी दिली आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी ७४.७० तर महिला मतदारांची टक्केवारी ७५.३८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. वरील आकडेवारी भ्रमणध्वनीद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरून प्राप्त झालेली असल्याने अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
आरमोरी तालुक्यात ७८.०३ टक्के मतदान
आरमोरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या १० जागांसाठी ७८.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. आरमोरी तालुक्यात ९३ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. येथे ५५ हजार ३८३ मतदार होते.
आष्टी परिसरात ७३.६७ टक्के मतदान
चामोर्शी तालुक्याच्या आष्टी परिसरात गुरूवारी जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी सर्व केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. मात्र बऱ्याच मतदान केंद्रावर मतदार यादीमधील क्रमांक चुकीचा होता. त्यामुळे यादीमध्ये नाव न मिळाल्याने काही मतदार मतदानाचा हक्क न बजावता परत गेले. आष्टी परिसराच्या १२ गावांमध्ये एकूण १४ हजार ३७ मतदारांपैकी १० हजार ८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या १२ गावातील मतदानाची सरासरी टक्केवारी ७३.६७ आहे.
आष्टी येथील मतदान केंद्रावर ६७ टक्के मतदान झाले. या केंद्रावर जवळपास ७५ ते ८० टक्के मतदान होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या चुकीमुळे मतदार याद्या बरोबर नसल्याने मतदानाची टक्केवारी घटली. याशिवाय बीएलओंनी घरोघरी व्होटर स्लिप न पोहोचविल्याने काही मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. त्यामुळे थोडावेळ येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनखोडा येथील मतदान केंद्र क्र. १ वर ७०० पैकी ५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. येथील मतदानाची टक्केवारी ८२.७१ आहे. केंद्र क्र. २ वर ६०० पैकी ४९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून येथील टक्केवारी ८२.६० आहे. केंद्र क्र. ३ वर ७२९ पैकी ५९४ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ८१.७५ आहे. सदर तिन्ही केंद्र मिळून सरासरी ८२ टक्के मतदान झाले. या केंद्रांवरील प्रतिनिधी बाहेर गेल्याने व त्यानंतर दुसरे प्रतिनिधी या केंद्रावर बसले. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान आष्टीचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी घटनास्थळ गाठून येथील वातावरण शांत केले.
इल्लूर येथील मतदान केंद्रावर एकूण २ हजार १७८ मतदारांपैकी १ हजार ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७४.१९ आहे. चौडमपल्ली येथील केंद्रावर ७९५ पैकी ६५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ८३ टक्के मतदान झाले. मार्र्कंडा येथील केंद्रावर १ हजार ५९८ पैकी १ हजार १६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथील मतदानाची टक्केवारी ७३.२ आहे.
पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यात झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात तगडा पोलीस बंदोबस्त होता.