कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 01:28 AM2017-03-20T01:28:16+5:302017-03-20T01:28:16+5:30

कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे.

Farmer metakutis due to carolable diseases | कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

कारल्यावरील रोगांमुळे शेतकरी मेटाकुटीस

googlenewsNext

लाखो रूपयांचे उत्पादन बुडाले : हजारो रूपयांचे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येईना
पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज
कारले पिकाच्या लागवडीपासूनच या पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कारले पीक धोक्यात आले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपये उत्पन्न मिळवून देणारे कारल्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने देसाईगंज तालुक्यातील कारले उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
देसाईगंज तालुका गाढवी नदीमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. अर्ध्या भागातील शेतीला इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. तर अर्ध्या भागात सिंचनाची सुविधा नसल्याने यातील बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. काही शेतकरी विहीर, कुपनलिका यांच्या माध्यमातून सिंचन करतात. पारंपरिक धान पिकाला बगल देत किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), पोटगाव, विहिरगाव, अरततोंडी, उसेगाव, कुरूड, कोंढाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यात सुरूवात केली. विशेष करून या भागात कारले पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपूरचे व्यापारी थेट गावी येऊन मालाची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा वेळ व खर्च वाचतो. दिवसेंदिवस कारले पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मार्चपर्यंत लाखो रूपयांचे उत्पादन कारले पिकाच्या माध्यमातून होत होते. यावर्षी मात्र वातावरण या पिकाच्या विरोधात आहे. अगदी लागवडीपासूनच कारले पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी आपल्या पध्दतीने किटकनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दिवसेंदिवस कारले पीक रोगांचाच्या गर्तेत सापडत चालला आहे. उत्पादन तर सोडाच कीटकनाशकांवर झालेला हजारो रूपयांचा खर्च भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन नाही
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग असला तरी या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या कधीच जाणून घेत नाही. केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे रंगविण्याचे काम या विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असतानाही एकाही कृषी सहायकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. कृषी केंद्र चालक जे कीटकनाशक लिहून देतील, तेच कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.
शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, यासाठी शासन अनेक योजना राबविते. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही कृषी विभागाचे अधिकारी मात्र त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नसल्याचे विपरित परिस्थिती दिसून येत आहे.

Web Title: Farmer metakutis due to carolable diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.