जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांचा घात
By Admin | Published: March 10, 2016 02:32 AM2016-03-10T02:32:08+5:302016-03-10T02:32:08+5:30
महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत.
संकटे संपेना : शेतकऱ्यांची मुले शिकूनही बेरोजगार
सासरा : महाराष्ट्र शासनाने इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नर्स सुविधा सुरु करून सर्व प्रशासकीय बाबी आॅनलाईन सुरु केल्या आहेत. राज्यात खेड्यापाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुले ग्रामपंचायत कार्यालयात तसेच इतर कार्यालयात डाटा आॅपरेटर म्हणून काम करत आहेत. त्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढून नियमित करू, असे आश्वासन विधीमंडळ अधिवेशनात दिले होते. त्या अनुषंगाने अद्यापही काहीच हालचाल होत नसल्याचे दिसताच भावी आयुष्याचे चित्र रंगवित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचे बेहाल होत असल्याचे चित्र आहे.
यापूर्वीच्या सरकारने ए.पी.एल. कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून राशन पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून गरीब शेतकऱ्यांचे हित जोपासले होते. ते मिळणारे धान्य सद्याच्या सरकारने बंद केले आहे. नापिकी, दुष्काळी आदी कारणाने धान्याचे अत्यल्प उत्पान होऊ लागले. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे धान्य कोठून आणावे? मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या कशा सोडवाव्यात? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. अच्छे दिनांच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांचा घात होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील नागरिक चुलीवर स्वयंपाक करत होते. त्यासाठी इंधन म्हणून लाकडांंचा उपयोग करत होते. अलिकडे वृक्षांचा तुटवडा पडला आहे. वृक्षतोडीवर बंदी आहे. बदलत्या युगात नवनवीन संशोधने लागली आहेत.
नवीन सोई सुविधा स्वीकारल्या जात आहेत. चुलीवरच्या स्वयंपाकाला फाटा दिल्या गेल्याने सिलेंडर गॅस सुविधा विकसीत झाली. बदलत्या काळातील बदलत्या सोई सुविधा सहर्ष स्वीकारण्यात येऊ लागल्या. ज्यांचेकडे स्वयंपाकासाठी गॅस सुविधा आहे. अशांना रॉकेल विक्री केंद्रातून राशन कार्डवर रॉकेल मिळणार नाही. असा फतवा काढण्यात आला.
गॅस सुविधेने स्वयंपाक करता येतो. पण वीज खंडीत झाल्यास घरात प्रकाशासाठी उपयोग करता येत नाही. एखाद्या कुटुंबाने काटकसर तसेच पदरमोड करून पैसे संचयित केले. परिवर्तन काळाची गरज आहे. हे ओळखून गॅस कनेक्शन विकत घेतला.
एखाद्याने काटकसर करून, अर्धपोटी उपाशी राहून गॅस कनेक्शन घेतला. म्हणजे तो श्रीमंत गर्भश्रीमंत झाला असे समजणे संयुक्तीक वाटत नाही. कुठेतरी शासन, गरीब जनतेवर अन्याय करत आहे हे सिद्ध होत आहे. तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे राहिले अशी अवस्था आहे.तांत्रिक बिघाडाने, नैसर्गिक आपत्तीने जेव्हा विद्युत खंडीत होते.
तेव्हा घरात प्रकाश पुरविण्यासाठी रॉकेलची गरज असते. म्हणून एपीएल, बीपीएल, अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य घेणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्डधारकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा अशी शेतकरी, शेतमजूर पालकांनी मागणी केली आहे. वित्तीय वर्षात डाटा आॅपरेटर्सना आपापल्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. डाटा आॅपरेटर्सना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)