कृषी निविष्ठांनी वाढविली कर्मचाऱ्यांची डोकेदुखी
By admin | Published: October 10, 2016 12:57 AM2016-10-10T00:57:06+5:302016-10-10T00:57:06+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व इतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात येते.
वेतनातून वाहतूक खर्च : ग्रामपंचायतमध्ये ठेवावे लागते साहित्य
गडचिरोली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व इतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात येते. मात्र आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची अडचण वाढली आहे.
कृषी आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार कृषी निविष्ठांचे वितरण पुरवठादार संस्था नेमून करणे आवश्यक आहे. मंडळ कृषी अधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याला परमिट दिल्यानंतर तो शेतकरी पुरवठादार संस्थेकडे जाऊन परमिटवर लिहिलेले साहित्य ताब्यात घेईल. मात्र पुरवठादार नेमला नसल्याने कृषी कर्मचाऱ्यांनाच सदर काम करावे लागते. लाखो रूपयांचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नाही. क्षेत्रीय कर्मचाऱ्याला कृषी निविष्ठा नेण्यासाठी दबाव टाकला जातो. क्षेत्रीय कर्मचाऱ्याला स्वत:चे कार्यालय नाही. अशा परिस्थितीत या निविष्ठा कुठे ठेवाव्या, असा प्रश्न निर्माण होतो. नाईलास्तव कृषी निविष्ठा ग्रामपंचायत किंवा शेतकऱ्यांच्या घरी किंवा इतरत्र ठेवाव्या लागतात. त्यामुळे निविष्ठांची सुरक्षितता धोक्यात येते. निविष्ठा गावापर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा क्षेत्रीय कर्मचाऱ्याला स्वत:च्या वेतनातून करावा लागत आहे. अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना झिंक सल्फेट वितरित केली जाते. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ ते ३० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर वापरावी, असे सांगण्यात आले आहे. मागील हंगामापर्यंत याच शिफारशीनुसार झिंकचे सल्फेटचे वाटप केले जात होते. परंतु यावर्षी १० किलोे प्रति हेक्टर झिंक सल्फेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजेच ४ किलो प्रति एकर वापरावे लागणार आहे. एका एकर जमिन असलेल्या शेतकऱ्याला १० किलोच्या पॅकिंगमधून चार किलो वेगळे काढून द्यावे लागत आहे. याचे वितरण कमी-अधिक प्रमाणात होत आहे. युरिया ब्रिकेट्स अप्लिकेटर फोडून कसे द्यावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहतात. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.