शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, तहसीलदार भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:42 AM2021-07-14T04:42:23+5:302021-07-14T04:42:23+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा एकांश स्तरावर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात झालेली घट आणि अन्य अधिसूचित जोखमीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा एकांश स्तरावर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात झालेली घट आणि अन्य अधिसूचित जोखमीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई पॉलिसीचे नियम आणि अटी यांच्या अनुसार करण्यात येणार आहे. २०२१-२२ या वर्षाकरिता शेतकऱ्यांना ६२५ रुपये प्रतिहेक्टर विमा हप्ता भरायचा असून ज्यामध्ये प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम ३१ हजार २५० रुपये निर्धारीत करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक यांनी दिली; परंतु विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत कृषी विभाग कार्यालय कोरची येथे किंवा पीक विमा प्रतिनिधी यांना सूचित करणे गरजेचे आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या विमाकरीता पात्र असतील. विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यावेळी कृषी अधिकारी विद्या मांडलिक, कृषी मंडल अधिकारी लाकेश कटरे, पीक विमा प्रतिनिधी प्रफुल्ल ऊके आदी उपस्थित होते.