शेतीला पाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 09:53 PM2018-10-21T21:53:06+5:302018-10-21T21:54:13+5:30
तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. खा.अशोक नेते यांनी ही समस्या जाणून घेऊन संबंधित सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या निर्देशानुसार उपसा सिंचन योजनेची मोटार दुरूस्त करण्यात आली. आता शेतजमिनीला पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बोरी येथील गेल्या १५ वर्षांपासून उपसा सिंचन योजना बंद पडली होती. आता खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती होऊन योजना सुरू झाली आहे. आता २२ आॅक्टोबर सोमवारपासून बोरी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. खा.अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याच्या बोरी भागात दौरा केला. दरम्यान आयोजित जनसंपर्क बैठकीत बोरी येथील अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना बंद असल्याने धानपीक वाचविण्याचा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे. निसर्गाने पाठ फिरविली असून धानपिकाला अखेरचे एक पाणी आवश्यक आहे. सध्या बोरी भागातील धानपीक शेवटच्या टप्प्यात असून लोंब फुटत आहेत. अशावेळी धानपिकाला पाणी न मिळाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे, अशी समस्या खासदारांपुढे मांडली.
दरम्यान खा.नेते यांनी लागलीच लघुसिंचन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नरेश बावनगडे यांच्याशी संपर्क साधला. सदर योजनेच्या बंदची कारणे जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेसाठी उपसा सिंचन योजनेची मोटार व इतर बाबींची दुरूस्ती करून शेतकऱ्यांच्या धानपिकाला तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांच्या प्रयत्नाने मोटारची दुरूस्ती करून ही योजना सुरळीत करण्यात आली. आता सोमवारपासून सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी बोरी भागातील धानपिकाला मिळणार आहे. बैठकीला भाजपचे प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, कार्यकारी अभियंता शेंडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.
अहेरी उपविभागाला न्याय देण्यास कटिबद्ध-नेते
अहेरी उपविभागात आजही शिक्षण, आरोग्य, सिंचन, रोजगार व इतर क्षेत्रातील अनेक समस्या कायम आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी आपला केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. अहेरी उपविभागाचा विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहो, अशी ग्वाही खा.अशोक नेते यांनी यावेळी दिली.