वयाच्या चाळीशीत ३० मुलांचे पालकत्व स्वीकारणारा ‘बाप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:07+5:30
विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड पाहून सरांनी अशा शिक्षणाची गोडी असणाऱ्या मुलांचे पालकत्व घेण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्यांनी ‘संस्कार’ ही संस्था स्थापन केली.
रवी रामगुंडेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, हलाकीची परिस्थिती आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक होतकरू मुले शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे क्षमता असूनही त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. अशाच होतकरू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या राहण्याचीही सोय करणारा बाप माणूस या तालुक्यात आहे याची कल्पना अनेकांना नाही. प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या १२ वर्षांपासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.
विजय सोमय्या सुंकेपाकवार असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तेवढ्याच समर्थपणे साथ देत एक प्रकारे मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विजय यांच्या पत्नी पुजा यांचीही यात मोलाची भूमिका आहे.
विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड पाहून सरांनी अशा शिक्षणाची गोडी असणाऱ्या मुलांचे पालकत्व घेण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच त्यांनी ‘संस्कार’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून तुटपुंज्या व्यवस्थेतही उन्हाळी निवासी केंद्र सुरू केले. आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली. काहींनी मदतीची हात पुढे केले. त्यातून पुढे मुलांना मोफत शिकवणी वर्गासोबत राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था होऊ लागली. शेगावच्या श्री संत गजानन महाराज सेवा संस्थानने त्यांना ५ संगणक भेट दिले. त्यातून गरीब व होतकरू मुले मोफत संगणकही शिकत आहेत. ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पनाही राबविली जाते. लॉकडाऊनच्या काळात अडचण असली तरी आतापर्यंत ३० मुलांचे पालकत्व निभावले आहे.
स्वत:पुरते जीवन हे खरे जीवन नाही. आपल्यामुळे कुणी सुखी झाला का? कुणाला आपण उपयोगी पडलो काय? आपल्या जीवनाची ज्योत संपण्याआधी आपण किती दिवे प्रज्वलित करू शकलो याचे समाधआन आपल्याजवळ असले पाहीजे. त्यामुळेच हा उपक्रम निस्वार्थ भावनाने आणि स्वयंस्फूर्तीने सुरू केला. -विजय सुंकेपाकवार
हा सेवायज्ञ करताना मला आपला-परका असा भेद अजूनही जाणवला नाही. याचे कारण आम्ही शिकवलेली मुले अजूनही समाजाप्रती सेवाभाव ठेऊन आमचा वारसा पुढे चालविण्यास प्रवृत्त होत आहेत. हे आम्ही या संस्थेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कार्याचे सार्थकच समजावे लागेल. या कार्याला माझे सदैव पाठबळ राहील.
- पुजा सुंकेपाकवार
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम !