लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील पेपर मिल कॉलनी परिसरात मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ही पिल्ले नागरिकांना दिसल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन गेले व त्यानंतर त्यांना नागपूरच्या गाेरेवाडा प्राणिसंग्रहालयात साेडण्यात आले. सध्या बिबट मादीला तिची पिल्ले आढळून येत नसल्याने ती आक्रमक झाली आहे. तिच्यापासून हल्ल्याचा धाेका असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान बिबट मादीने कोंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर ती नेहमीच्या जागेवर परत गेली असावी. आष्टी परिसरातील जंगलाला लागून असलेल्या गावातील नागरिकांना बिबट मादीपासून धाेका असून, नागरिकांनी जंगलात एकटे जाऊ नये, गावातही रात्री बाहेर पडू नये, अशी सूचना वनविभागाने परिसरातील नागरिकांना केली आहे. मागील वर्षभरापासून आष्टी, इल्लूर परिसरातील नागरिक बिबट्यांच्या दहशतीत जीवन जगत आहेत. बिबट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी आहे.
आमटे दाम्पत्याने दिली भेटबिबट्याच्या दोन्ही पिलांना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय किंवा हेमलकसा येथे पाठविण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. दरम्यान समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी मार्कंडा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्या पिलांची पाहणी केली. दोन पिलांपैकी एका पिलाला व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यावर डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केले. भेटीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी भारती पवार तसेच अनिकेत आमटे, डाॅ. दिगंत आमटे व समीक्षा आमटे उपस्थित हाेते.