भामरागड तालुक्यात लाईनमनची पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:35+5:302021-05-21T04:38:35+5:30
भामरागड : तालुक्यातील विजेची समस्या लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे आहे, परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा ...
भामरागड : तालुक्यातील विजेची समस्या लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे आहे, परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली नाही.
गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
नागाेबा देवस्थान दुर्लक्षित
गडचिरोली : गोगाव पासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
जनजागृतीचा अभाव
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहिती अभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका स्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. यासाठी स्वतंत्र निधीची गरज आहे.
पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैर आदिवासी नागरिकांना वन पट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदार मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
रेगडी येथे बँक शाखा सुरू करा
घोट : घोट पासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे, शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.
अनेक वार्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्याने ही किरकोळ अपघात घडतात.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी होत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, जाण्यासाठी रस्ताही नाही.
मामीडीताेगू जवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)- नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्त करण्यात यावी.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातून आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.
परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले
गडचिराेली : नगरपरिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगरपरिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
सिराेंचा-आसरअल्ली मार्गाची दुर्दशा
सिरोंचा : सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते ; परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने या मार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी या मार्गाची दुरुस्ती केली जाते.
पळसगाव जवळ उंच पूल बांधण्याची मागणी
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले ; परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात येथून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी जोगीसाखरा व पळसगाव येथील नागरिकांनी केली आहे.
सफाई कामगारांना किमान मजुरी द्या
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली येथे कार्यरत सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्यावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत अनेक सफाई कामगार कार्यरत आहेत. यातील बहुतांश कामगार गडचिरोली शहरातच राहतात. मात्र, कामगारांना केवळ १२० ते १५० रुपये एवढीच मजुरी कंत्राटदारामार्फत दिली जात आहे.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगरपंचायत स्वच्छता बाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगरपंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर विकासाला गती मिळेल, अशी आशा शहरवासीय बाळगून होते. मात्र, ही अपेक्षा खोटी ठरली आहे.
खड्ड्यांमुळे प्रवाशांना २५ किमीचा फेरा
अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मार्गाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही हाेत नसल्याचे दिसून येते.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. प्रशासनाने ठाेस नियाेजन करून या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.