तीन ठिकाणी भरला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:43 PM2018-12-30T23:43:55+5:302018-12-30T23:45:02+5:30
शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून येथील हनुमान वार्डालगतच्या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट ओटे, रोड, नाली व शेडचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाकडून प्राप्त झालेल्या तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून येथील हनुमान वार्डालगतच्या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट ओटे, रोड, नाली व शेडचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने आठवडी बाजाराच्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी रविवारी येथील बोरमाळा नदी घाट रस्ता, लगतची शेतजमीन तसेच चंद्रपूर मार्गावरील नगर भवन परिसरात तुटक-तुटक स्वरूपात आठवडी बाजार भरला. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाजाराची जागा बदलल्याने काही विक्रेतेही व्यवसाय मंदावल्याचे सांगत होते.
आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नवीन जागेत बाजार भरविण्यासाठीच्या हालचाली वाढल्या. दरम्यान मुख्याधिकारी संजीव ओहोड यांनी विक्रेत्यांची बैठक लावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विक्रेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून नगर भवनच्या जागेत बाजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २४ डिसेंबरला पालिकेच्या वतीने नगर भवनच्या प्रवेशद्वारावर सूचनाफलक लावून नगरभवनच्या जागेत बाजार भरण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर जागा आरक्षित करण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ वाढली. मात्र दरम्यान काही कारणास्तव गडचिरोलीचा आठवडी बाजार जुन्याच जागेत भरणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी माध्यमांना कळविले. त्यानंतरही रविवारी काही विक्रेत्यांनी जुन्या बाजाराच्या परिसरात बोरमाळा मार्गावर तसेच लगतच्या शेतात दुकाने लावली. चंद्रपूर मार्गालगत एजन्सीच्या परिसरात विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली. काही दुकानदारांनी नगर पंचायतच्या भवनात जागा पकडून त्या ठिकाणी मालाची विक्री केली. एकूणच आठवडी बाजाराची जागा बदलल्याने ग्राहकांना पायपिट करावी लागली. आठवडी बाजाराचे ठिकाण बदलल्याने अनेकांना त्रास झाल्याचे कित्येक जण बोलून दाखवत होते. आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात काही अडचणी येत आहेत.
वाहन पार्किंग व्यवस्थाही विस्कळीत
रविवारच्या आठवडी बाजार वेगवेगळ्या तीन ते चार ठिकाणी भरल्यामुळे दुचाकी वाहन पार्र्किंग व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली होती. काही ग्राहकांनी थेट बोरमाळा मार्गावर वाहने नेली. नगर पंचायत भवन परिसरातही वाहने अस्ताव्यस्त स्थितीत लावण्यात आली होती. एकूणच बाजाराची जागा बदलल्याने अनेकांना त्रास झाला.