अखेर दर्शनासाठी मार्कंडेश्वराचे दार उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:06 AM2021-03-13T05:06:59+5:302021-03-13T05:06:59+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या काळात मोठी गर्दी असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जत्रेला ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या काळात मोठी गर्दी असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जत्रेला परवानगी दिली नाही. याशिवाय दि. १०पासून २० मार्चपर्यंत मंदिर प्रवेश बंद ठेवला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला केवळ पारंपरिक पूजेशिवाय कोणालाही मंदिर प्रवेश देण्यात आला नाही. आमदार डॉ. देवराव होळी यांचे कार्यक्षेत्र असताना त्यांनाही मंदिर प्रवेश नाकारला होता. त्यांनी आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत कोरोनाचे नियम पाळत भाविकांना मंदिर प्रवेश द्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली.
दरम्यान राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक खबरदारी घेऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यांनी परवानगीबाबत नवीन आदेश निर्गमित केले आहेत. आता १३ मार्चपासून दैनंदिन ५०० भाविकांना तहसील कार्यालयाकडून टोकन घेऊन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये एकावेळी ५० भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर परिसरात परवानगी मिळणार आहे. तसेच प्रत्यक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात पाच भाविक एकावेळी जाण्यास मुभा राहणार आहे.
(बॉक्स)
टोकन घेण्यासाठीची प्रक्रिया
मार्कंडादेव दर्शनासाठी टोकनची व्यवस्था तहसील कार्यालय चामोर्शी येथे करण्यात आली आहे. एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाच व्यक्तींसाठी टोकन मिळू शकतात. त्यासाठी सर्वांचे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. टोकनसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारी तातडीने सुरू करण्यात आली. शिवाय शनिवारी सकाळी ९ पासून सायंकाळी ६पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे. एका दिवशी ५०० भाविकांच्या मर्यादेत टोकन वाटप करण्यात येणार आहे.
(बॉक्स)
कोरोनाच्या नियमांचे पालन आवश्यक
टोकन घेण्यासाठी येताना नागरिकांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे अनिवार्य आहे. तसेच मार्कंडेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. दर्शन घेताना त्या परिसरात शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे. तिथे उपस्थित प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालनही करणे भाविकांना बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व भाविकांनी कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊनच देवदर्शन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.