गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर संकट काेसळले आहे. १४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा व किराणा, फळ आदी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. परिणामी फूटपाथवरील विक्रेते व हातगाडी घेऊन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा राेजगार हिरावणार आहे. अशा फेरीवाल्यांना राज्य शासनाच्या वतीने दीड हजार रुपयांची मदत देणार आहे. गडचिराेली नगर परिषद, देसाईगंज नगर परिषद व इतर शहरी भागात नाेंदणीकृत जवळपास ११०० फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना शासनाची आर्थिक मदत मिळणार आहे. पथविक्रेते व फेरीवाल्यासंदर्भात २०१७ मध्ये शहरी भागात सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यावेळी नाेंदणी करण्यात आली हाेती.
काेट...
आम्ही ठेला लावून वस्तूंची विक्री करताे. मात्र काेराेना महामारीने संचारबंदी लागू झाल्यामुळे आमचा व्यवसाय बंद राहणार आहे. आमच्यावर बेराेजगारीची पाळी आली असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- तुकाराम मेश्राम
..................
शासनाच्या वतीने आम्हा फेरीवाल्यांना केवळ दीड हजार रुपयांची आर्थिक मदत घाेषित करण्यात आली. मात्र वाढत्या महागाईत व संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी ही मदत अतिशय ताेकडी आहे. शासनाने पुरेशी मदत देण्याची गरज आहे.
- विनाेद काटेंगे
..............
मी पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताे. संचारबंदीमुळे उद्यापासून आमच्या व्यवसायाला पूर्णत: ब्रेक लागला आहे. काेराेनामुळे मागील तीन-चार महिन्यांत फारच अत्यल्प व्यवसाय झाला. भीतीमुळे १५ दिवसांपासून व्यवसायात फरक पडला आहे.
- सुजीत ठाकूर
बाॅक्स...
गडचिराेली शहरात ७२० फेरीवाले
गडचिराेली न.प. प्रशासनाच्या वतीने फूटपाथ व्यावसायिक व फेरीवाल्यांबाबत २०१७ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यांचे फार्म भरून नाेंदणी करण्यात आली. त्यावेळी ५८९ फेरीवाल्यांची नाेंदणी झाली. १६३ जणांनी ऑनलाईन नाेंदणी केली. शहरात जवळपास ७२० फेरीवाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
बाॅक्स...
देसाईगंज शहरात ३१२ नाेंदणीकृत फेरवाले
देसाईगंज न.प.प्रशासनाच्या वतीने हातगाडी, हातठेले, फूटपाथवरील किरकाेड विक्रेते तसेच फेरीवाले आदींबाबत सर्वेक्षण करण्यात आले. फार्म भरलेल्या ३१२ फेरीवाल्यांची नाेंदणी करण्यात आली. फेरीवाल्यांची नाेंदणी केवळ शहरी भागातच हाेत आहे.
बाॅक्स...
बेराेजगारीचे संकट
काेराेनाच्या संचारबंदीने जिल्हाभरातील जवळपास २ हजार ३३२ फेरीवाले व्यावसायिकांवर बेराेजगारीचे संकट आले.