नवीन पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा मुहूर्त सापडेना!
By admin | Published: November 6, 2014 01:34 AM2014-11-06T01:34:26+5:302014-11-06T01:34:26+5:30
नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा म्हणून वैरागड येथे ३० वर्षांपूर्वी ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.
वैरागड : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा म्हणून वैरागड येथे ३० वर्षांपूर्वी ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु सदर पाणी पुरवठा योजना गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार निकामी ठरली आहे. या अनुषंगानेच १ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. नवीन पाणी पुरवठा योजनेचा आराखडाही तयार करण्यात आला. परंतु सदर योजनेच्या आर्थिक मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गडचिरोली, उपविभागीय अधिकारी कार्यकारी अभियंता कुरखेडा यांच्याकडे अडकुन आहे. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.
वैरागड येथे जुन्याच पाणी पुरवठा योजनेंंतर्गत गावात पाणी पुरवठा सध्य:स्थितीत सुरू आहे. ग्रामपंचायत मार्फत दरवर्षी पाणी पुरवठ्यासाठी हजारो रूपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु भर पावसाळ्यात अर्ध्याअधिक नळधारकांना पिण्यापुरताही पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील पाईप लाईनला समान पाणी पुरवठा होण्यासाठी योग्य ठिकाणी व्हॉल्व नसल्यामुळे सखल भागातील नळधारक कुटुंबांना पाण्याचा अधिक पुरवठा होत नाही. उंच भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बारमाही भटकंती करावी लागते. दरवर्षी पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी जि. प. सदस्य व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरविण्यात आले.
नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित न करता भोयर यांच्या घराजवळ ग्रा. प. च्या जागेवर केवळ पाण्याची टाकी तयार करण्यात आली. वाढते नळधारक व समस्या लक्षात घेऊन वैरागड येथे गोरजाई डोहाजवळ नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (वार्ताहर)