१० हजार बालकांचे पहिलीत पाऊल
By admin | Published: June 26, 2016 01:08 AM2016-06-26T01:08:31+5:302016-06-26T01:08:31+5:30
२७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.
स्वागताची तयारी सुरू : ४ हजार ८७० विद्यार्थिनी; गळती थांबविण्याचे निर्देश
गडचिरोली : २७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
लहान बालक बोलायला लागल्यानंतर जवळपास वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच शिक्षणाचे थोडेफार धडेही दिले जातात. मात्र प्रत्यक्षात शिक्षण पहिल्या वर्गापासूनच सुरूवात होते. शाळेमध्ये पहिल्यांदाच बालक जात असल्याने पालक वर्गामध्ये उत्सुकता राहते.
प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या गोळा केली आहे. यामध्ये चालू सत्रासाठी सुमारे ९ हजार ८२० विद्यार्थी दाखल होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६३ विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे ४ हजार ४६६ विद्यार्थी, विमुक्त भटक्या जमातीचे १ हजार ४३, इतर मागास वर्गातील २ हजार ६९४, अल्पसंख्यांक समाजाचे ५२ विद्यार्थी व बिगर मागास प्रवर्गाचे ५०२ विद्यार्थी आहेत. दाखलपात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ४ हजार ९५० तर मुलींची संख्या ४ हजार ८७० एवढी आहे. उन्हाळाभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये दाखल केले आहे. शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, याचीही खबरदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)
८७५ शाळाबाह्य
विद्यार्थी आढळले
शिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळ्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ८७५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यामध्ये ४३२ मुले व ४४३ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गात दाखल केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५२, आरमोरी ७, धानोरा ९४, चामोर्शी १२, अहेरी ६१, एटापल्ली १६७, सिरोंचा ११६, मुलचेरा ५, कोरची ३७, भामरागड २५६, देसाईगंज १६, कुरखेडा तालुक्यात ५२ विद्यार्थी आढळून आले.
अधिकारी, पदाधिकारी करणार नवागतांचे स्वागत
शाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केले जाणार आहे. कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणत्या शाळेमध्ये जावे, याचे नियोजन शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर सभा घेऊन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी गावातून रॅलीसुध्दा काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद
विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम मुख्यमंत्री सुध्दा करणार आहेत. भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेत एक ते पाच वर्ग आहेत. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सदर विद्यार्थी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सेंटरमधून मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.