लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचांदूर येथून १२ किमी अंतरावर कुसुंबी गाव आहे. या गावातील आदिवासी कोलाम समाज शेती करुन पोट भरत होते. परंतु माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची शेतजमीन व गाव उठवून तिथे माईन्स सुरु केली. कंपनीने या गरीब आदिवासींना नोकरी तर दिलीच नाही. परंतु कुसुंबी-लिंगनडोह रस्त्यावर कब्जा करुन या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या व्यक्तींनाही आता अडविले जात आहे. याविरोधात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्याच माईन्सच्या टॉवरवर चढून सोमवारी विरुगिरी केली.याविरोधात यापूवीर्ही आंदोलने झाली. निवेदनही देण्यात आले. परंतु याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अखेर संतप्त होऊन पाच जणांनी टॉवरवर चढून सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे.कुसुंबी हे गाव प्रत्यक्षात व नकाशावर होते. जवळपास येथे २५ आदिवासी शेती करुन गुजरान करीत असताना माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची जमीन माईन्सकरिता घेण्यात आली. परंतु कंपनीने या गावातील जनतेचे पुनर्वसन केले नाही. मोबदला दिला नाही. कुटुंबातील एकाही सदस्याला नोकरी दिली नाही, असा आरोप कुसुंबीवासीयांकडून करण्यात आला. याकरिता अनेक आंदोलने झाली. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. अशातच कुसुंबी- लिंगनडोह रस्ता शासनाचा असताना कंपनीने कब्जा करुन या रस्त्यावर कंपनीने गेट लावले. ये जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबतही प्रशासनाला अनेक निवेदन देऊन आंदोलने केली. मात्र रस्त्यावरील कंपनीचे गेट काढण्यात आले नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी कुसुंबी येथील रामदास मंगाम (४०), जयराम कुळमेथे (३२), महादेव कुळमेथे (४०), सागर येडमे (३०), गणेश सिडाम ( ३०) अशा पाच आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले.
तीनही तहसीलदार घटनास्थळीकोसंबी गाव जिवती तालुक्यात आहे. आंदोलनस्थळ म्हणजे टॉवर राजुरा तालुक्यात तर पोलीस स्टेशन कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन येत असल्याने घटनेची माहिती मिळताच राजुरा, जिवती, कोरपना तालुक्याचे तहसीलदार, तलाठी व गडचांदूर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिपर्यंत ते आंदोलनकर्त्यांशी बोलत होते.