विशाखा समित्यांबाबत वनविभाग झाला सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:35 AM2021-03-28T04:35:03+5:302021-03-28T04:35:03+5:30
गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात ...
गडचिराेली वनवृत्तांतर्गत पाच वनविभाग येतात. यात शंभरावर महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक वनविभागात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. या समितीमधील काही सदस्यांची बदली हाेते तर काही सदस्य सेवानिवृत्त हाेतात. त्यामुळे दरवर्षी या समितीचे पुनर्गठन हाेणे आवश्यक आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा या समित्या अपडेट करण्यासाठी वनविभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेने विशाखा समित्यांचे पुनर्गठन करावे, अशी मागणी वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबत गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशाेर मानकर यांना विचारले असता, पाचही वनविभागांमध्ये विशाखा समित्या कार्यरत आहेत. या समित्यांचे काही सदस्य बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
(बॉक्स)
महिला कर्मचाऱ्यांच्या मर्यादा समजून घ्या
- महिला व पुरुष यांच्या शारीरिक जडणघडणीत फरक आहे. महिला ही अधिकारी असली तरी तिच्या शरीराच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन करून दरवर्षी या समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कार्यालये या समित्यांचे पुनर्गठन करीत नाही. त्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास तक्रार करायची कुठे, असा प्रश्न महिला कर्मचाऱ्यांसमाेर उपस्थित हाेत आहे.
- प्रशासनात काम करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत महिला थाेड्या अधिक भावनिक राहतात. मात्र मनात कठाेरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याची प्रतिक्रिया महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.