पुरुषोत्तम भागडकर
तालुक्यात वनविभागाची शेकडो एकर वनजमिनीची जागा ओसाड व्हायला लागली होती. मात्र, वनविभागाच्या पडिक जागेवर विभागाने पुढाकार घेत नियोजन करून हिरवी वनराई फुलविण्याने जंगल बहरले आहे.
देसाईगंज तालुक्यात नैनपूर, शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव (हलबी) एकलपूरटोला या भागातील परिसरात झुडपी जंगलाची जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करून अनेक ठिकाणची वनजमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून त्या जागेवर गरजू व्यक्तीचे अतिक्रमण झालेले असताना त्यांना डावलून बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांचेशी आर्थिक व्यवहार करत वनजमिनीचे पट्टे देण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे तक्रारी केल्यावरून स्पष्ट होते.
या दरम्यान शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड यामध्ये वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुक्याच्या गावागावांत वनसमित्या तयार करून, स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देत अनेक योजना राबविणे सुरू केले. वृक्षलागवड केल्याने ओसाड जागेचे रूपांतर जंगलात होऊ लागले. देसाईगंज तालुक्यातील तत्कालिन अधिकारी, कर्मचारी तसेच आजमितीस कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी व वनव्यवस्थापन समित्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज शेकडो हेक्टर वनजमिनीवर घनदाट जंगले आकार घेऊ लागली आहेत.
(बॉक्स)
वृक्षलागवड वाढविण्याची आवश्यकता
उपलब्ध पाणीसाठा, गर्द वनराईमुळे प्राणीसंपदाही मोठ्या प्रमाणात वाढत असून ह्यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात मदत होऊ लागली आहे. त्यामुळे बनावट दस्ताऐवज सादर करून वनविभागाची जमीन हडपणाऱ्यांकडून ताब्यात घेऊन सदर जागेवर वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
110721\3846img_20200719_095141.jpg
वनविभागाचे नियोजनामुळे जंगले लागली बहरु