गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना अटक; एका महिलेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 08:52 PM2022-04-21T20:52:58+5:302022-04-21T20:54:18+5:30

Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नेलगुंडा येथे साध्या वेशात आणि विनाशस्त्र आलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यात एका महिला नक्षलीचा समावेश आहे.

Four Naxals arrested in Gadchiroli district; Including a woman | गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना अटक; एका महिलेचा समावेश

गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना अटक; एका महिलेचा समावेश

Next
ठळक मुद्दे१८ लाखांचे इनाम

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नेलगुंडा येथे साध्या वेशात आणि विनाशस्त्र आलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यात एका महिला नक्षलीचा समावेश आहे. यातील दोन जहाल नक्षलवाद्यांवर शासनाने १४ लाखांचे, तर उर्वरित दोघांवर ४ लाखांचे बक्षीस ठेवले होते. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली. यासंदर्भात, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफ ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवान गस्तीवर असताना नेलगुंडा येथे काही नक्षलवादी आल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान, पोलीस आल्याची चाहूल लागताच एका घरात साध्या वेशात असलेल्या त्या चार नक्षलवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले. त्यात बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे (३० वर्षे, रा. नेलगुंडा, ता. भामरागड (इनाम ८ लाख), मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे (३४ वर्ष, रा. कनोली, ता. धानोरा (इनाम ६ लाख), बापूची पत्नी सुमन ऊर्फ जन्नी कोमटी कुड्यामी (इनाम २ लाख) आणि अजित ऊर्फ भरत (इनाम २ लाख) यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, एसडीपीओ (भामरागड) नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

विविध कारवायांमध्ये सहभाग

जहाल नक्षली बापू वड्डे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम (एरिया कमिटी मेंबर) कार्यरत आहे. १४ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस शिपाई दुशांत नंदेश्वर यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर ७ खून, ३ चकमकी, १ जाळपोळ आणि २ दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत आहे. तो नक्षल्यांच्या ॲक्शन टीमचा सदस्य असून त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे आहेत. सुमन ही पेरमिली दलमची सदस्य आहे. तिचा ३ खून व ८ चकमकीत सहभाग आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील दोन गावांच्या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या हत्येत नक्षली मारोती आणि अजित यांचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नर्मदाक्का नावाची दहशत संपली जहाल नक्षली नेत्याचा मुंबईत मृत्यू

नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि उभी हयात नक्षल चळवळीत घालवलेली जहाल नक्षल नेता नर्मदाक्का ऊर्फ उप्पगुंटी निर्मला हिचा मुंबई येथील बांद्र्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ जून २०१९ ला तिच्यासह नक्षल नेता असलेल्या तिच्या पतीला तेलंगणा व गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कारागृहात हलविण्यात आले होते. तिथे अनेक दिवसांपासून नर्मदाक्का हिच्यावर उपचार सुरू होते.

Web Title: Four Naxals arrested in Gadchiroli district; Including a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.