कौसर खानलाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासीबहुल घनदाट जंगलाच्या सानिध्यात लहानाची मोठी होऊन वैद्यकीय अभ्यासक्रमापर्यंत मजल गाठणाऱ्या डॉ.कोमल मडावी यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. दुर्गम अशा झिंगानूर आणि नंतर सिरोंचा येथे शिकलेल्या डॉ.कोमल सिरोंचा येथेच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. आपल्या लोकांना सेवा देण्याची त्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली.शिक्षणाच्या अल्प सुविधा, विकासाचा अभाव आणि नक्षलवाद या गोष्टींमुळे क्षमता असूनही आदिवासी समाजातील अनेक युवक-युवतींचे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण काही जण अडचणींवर मात करत लक्ष्य गाठतात. डॉ.कोमल मडावी त्यापैकीच एक. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६० किलोमीटर अंतरावरीत झिंगानूर या आदिवासी गावातील डॉ.कोमल ही माडिया जमातीमधील पहिली महिला डॉक्टर बनली आहे. आपली माणसे, आपले गाव आणि जिल्ह्याला आरोग्य सुविधा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन कोमलने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. कोमलची आई आरोग्य विभागात आरोग्य सेविका, तर वडील गावीच शेती करतात. झिंगानूरहून सिरोंचा येथे शिक्षणासाठी आल्यानंतर येथील शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. कोमलने तिसऱ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा झिंगानूर येथे घेतले तर दहाव्या वर्गापर्यंतचे शिक्षण सिरोंचा येथे घेतले. त्यानंतर नागपुरातील कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून यवतमाळ येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवला. कोमलची लहान बहीण पायल देखील सध्या नागपूर येथे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. कोमलला शाळेत असताना फक्त माडिया भाषा बोलता येत होती, पण तिने परिस्थितीचा बाऊ करणं टाळत भाषेच्या अडचणीवरही मात केली. डॉ.कोमल आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रत्येक टप्यावर मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मित्र-मैत्रिणींना देते.
अन् आपल्याच गावात मिळाली ड्युटीयवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ.कोमलला एक वर्ष शासकीय सेवा करणे गरजेचे होते. त्यासाठी अर्ज भरताना नागपूर विभाग एवढाच पर्याय तिथे होते. जिल्हा निवडण्याचाही पर्याय नव्हता. पण आधार कार्डवरील पत्त्यावरून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्यांना त्यांचाच तालुका असलेल्या सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली. सध्या त्या कोविड केअर सेंटरची जबाबदारी सांभाळत आहे. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधीसाठा असावा, अशी अपेक्षा त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.