लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डातील पक्ष्यांना ठार मारण्याची माेहीम बुधवारपासून राबविली जात आहे. या माेहिमेमध्ये संकरित काेंबड्या, गावठी काेंबड्यांसह घरातील पाेपट, कबुतर व लव बर्डलाही ठार मारले जात आहे. फुले वाॅर्डातील काेंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रयाेगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर फुले वाॅर्डात बुधवारपासून पक्षी ठार मारण्याची माेहीम हाती घेतली आहे. पाळीव पक्षी सायंकाळी घरी येत असल्याने ६ ते रात्री १० वाजेपर्यंत माेहीम राबविली जात आहे. पशू संवर्धन विभागाच्या ५० कर्मचाऱ्यांचे दहा पथक तयार करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझेशन व इतर मदतीसाठी गडचिराेली नगर परिषदेचे पाच कर्मचारी सेवा देत आहेत. ठार मारलेले पक्षी नगर परिषदेच्या डंपिंग यार्डवर तयार केलेल्या खड्ड्यात शास्रीय पद्धतीने पुरले जात आहेत. पहिल्या दिवशी ७१५ पक्ष्यांना मारण्यात आले.