गडचिरोलीत चार लक्ष लिटर क्षमतेचा नवा जलकुंभ होणार
By admin | Published: June 26, 2016 01:13 AM2016-06-26T01:13:45+5:302016-06-26T01:13:45+5:30
गडचिरोली शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी काढण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४ लक्ष लिटर क्षमता
जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : एक कोटी नऊ लाखांचा निधी प्राप्त; अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणार
गडचिरोली : गडचिरोली शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी काढण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४ लक्ष लिटर क्षमता असलेल्या १ कोटी ३८ लाख रूपये किमतीच्या नव्या जलकुंभाचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहे. यापैकी गडचिरोली पालिकेला १ कोटी ९ लाख ९७ हजार ४० रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने तांत्रिक मान्यतेची कार्यवाही गतीने सुरू झाली आहे.
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सात जलकुंभ उभारण्यात आले आहे. मात्र या जलकुंभातील पाणी वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील हनुमान वार्ड, सुभाष वार्ड व नेहरू वार्ड हा भाग चढ असल्याने येथे नळाचे पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही. दरवर्षीच्या उन्हाळ्यात या प्रभागातील नागरिकांना सात ते आठ फूट खोल खड्ड्यातून बकेट टाकून पाणी काढावे लागते.
उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत असल्याने प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांची प्रचंड पंचाईत होत होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन व उर्वरित शहरात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी नवे जलकुंभ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली होती. प्रभाग क्रमांक ३ मधील नगर सेवक तथा माजी बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक तसेच नगरसेवक अजय भांडेकर यांनी सदर प्रश्न पालिकेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या जलकुंभाचा ठराव घेण्यात आला.
न.प. प्रशासनाच्या वतीने सदर जलकुंभाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी या जलकुंभाचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केले. (स्थानिक प्रतिनिधी)