गडचिराेली : गाेदावरी नदीवर तेलंगणा सरकारमार्फत उभारलेले मेडीगड्डा धरण हे भाजपने केलेले पाप आहे. या धरणामुळेच सिराेंचा तालुक्यात पुराचे सुलतानी संकट निर्माण झाले. याचा जाब काँग्रेसमार्फत विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले यांनी दिला.
जिल्ह्यात उद्भवलेला पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गडचिराेली येथे आले हाेते. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला. मेडीगड्डा धरणाचा सिराेंचा तालुक्याला काेणताही फायदा हाेणार नाही. उलट अनेक गावे या धरणाच्या पाण्यात बुडतील, याची माहिती असल्याने काँग्रेसने या धरणाला सुरुवातीपासूनच विराेध केला. मात्र, तत्कालीन भाजप सरकारने धरणाला परवानगी दिली. आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. धरणामुळे वनांचे माेठे नुकसान झाले आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही गडचिराेली जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. मेडीगड्डा धरणाविषयीची पूर्ण माहिती मागवून जाब विचारला जाईल. अनेकांना माेबादलासुद्धा मिळाला नाही, असा आराेप आ. नाना पटाेले यांनी केला.
आत्ताचे सरकार असंवैधानिक
सध्या राज्यात असलेले सरकार असंवैधानिक आहे. सहा जिल्ह्यांमधील ओबीसी आरक्षण शून्य टक्के केले आहे. याबाबत पुनर्याचिका दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पटाेले यांनी दिली.
पत्रकार परिषदेला आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खा. माराेतराव काेवासे, माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जेसा माेटवानी, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि. प. अध्यक्ष बंडाेपंत मल्लेलवार, हसनअली गिलानी, सगुणा तलांडी, डाॅ. नितीन काेडवते, रजनीकांत माेटघरे आदी उपस्थित हाेते.