अनुभवी जिल्हाधिकारी द्या
By admin | Published: November 3, 2014 11:26 PM2014-11-03T23:26:45+5:302014-11-03T23:26:45+5:30
मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
नव्या सरकारकडे मागणी : सुरेश पद्मशाली यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडचिरोली : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हा निर्मितीस ३२ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र गडचिरोली शहर, वडसा शहर, तालुक्याचे ठिकाण तसेच विविध मोठ्या गावांचा विकास झाला नाही. गडचिरोली हा राज्याच्या क्रमवारी शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा असल्याने महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी अनुभव नसलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नव्या अधिकाऱ्यांना अनुभव घेताघेता त्यांची बदली करण्यात येते. त्यामुळे नवे अधिकारी जिल्ह्याचा गतीने विकास करू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याबरोबर निर्माण झालेला लातूर जिल्हा व त्यानंतर निर्माण झालेले अनेक जिल्हे प्रगतिपथावर आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे.
जिल्हा निर्माण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेची (ग्रामपंचायतीची) स्वतंत्र इमारत होती. सद्यस्थितीत नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज खासदार निधीतून बांधलेल्या आदिवासी सांस्कृतीक भवनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी बांधलेली मुख्य मार्गावरील राजस्व भवनाची शासकीय इमारत दारूच्या रिकाम्या बॉटला ठेवण्यासाठी वापरली जात आहे. गडचिरोली शहरात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफीक सिग्नल दोन ते तीन वर्षापासून बंद आहे. एमआयडीसी व जिल्हा कारागृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी एकही बगीचा नाही. ५०० ते १००० नागरिक एकत्र बसू शकतील, असे नगर भवन अथवा सांस्कृतीक भवनाची सोय नाही. गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी स्वत: निवासी राहतात. मात्र ते गडचिरोली शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. तर जिल्ह्याच्या १२ तालुक्यांकडे व १६०० गावांकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येते.
जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा गतीमान असायला हवी. मात्र कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोपही सुरेश पद्मशाली यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्याची गरज असल्यामुळे अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पद्मशाली यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)