अग्निपंख देणार आत्मसमर्पितांना न्याय
By admin | Published: August 5, 2015 01:29 AM2015-08-05T01:29:19+5:302015-08-05T01:29:19+5:30
हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलवादी व नक्षल कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन,...
७९ जणांना साहित्य, भूखंड वाटप : पुण्याच्या विविध मंडळांचा पुढाकार
गडचिरोली : हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलवादी व नक्षल कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन, पुणे येथील आदर्श मित्र, रोटरी क्लब कात्रज पुणे, हिंद व श्रीकृष्ण तरूण मंडळ पुणे, लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरच्या पुढाकाराने अग्निपंख या नव्या योजनेचा मंगळवारी गडचिरोलीत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, आदर्श मित्र मंडळ पुण्याचे अध्यक्ष उदय जगताप, पुणे येथील श्रीकृष्ण तरूण मंडळाचे विशाल आव्हाड, हिंद तरूण मंडळाचे दिलीप गिरमकर, स्वामी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सूंचूवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यावेळी ३६ लोकांना टीव्ही, २१ जणांना भूखंड व २२ जणांना धनादेश वितरित करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र कदम यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून अनेक आत्मसमर्पितांना लाभ देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आहे. त्यामुळे रोजगारासाठी भटकण्याची गरज नाही. केवळ विचारधारा बदलवून आपण मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, असे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी शासन नवीन नवसंजिवनी योजना सुरू केली आहे. या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध आहे. वाट चुकलेल्यांनी मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. राहुल खाडे यांनी केले. यावेळी पोलीस, नक्षलपीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.