वंचित लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:50 PM2018-12-06T23:50:21+5:302018-12-06T23:51:21+5:30
शासनाची घरकुल योजना गरीब व गरजू नागरिकांसाठी आहे. मात्र अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीमंत व सधन कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. हा गरीब कुटुंबावरील अन्याय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाची घरकुल योजना गरीब व गरजू नागरिकांसाठी आहे. मात्र अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीमंत व सधन कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. हा गरीब कुटुंबावरील अन्याय आहे. वंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करून गरीब व गरजू नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा, अशा सूचना खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगर परिषद मुख्याधिकाºयांची आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी शेट्ये, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, नगर पालिका व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली शहरातील १ हजार ८ घरकुलांसाठी लागणारी शासकीय जमीन तत्काळ हस्तांतरीत करून लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याच्या सूचना केल्या.
एटापल्ली व सिरोंचा येथील डीपीआर तयार करून घरकूल मंजूर करण्यास सांगितले. तसेच कौशल्य विकास योजनेतून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित युवकांना पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचा लाभ द्यावा, शौचालय योजनेचे उद्दिष्ट मार्च पर्यंत पूर्ण करून शौचालय बांधकामासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन खा. अशोक नेते यांनी यावेळी केले. नगर परिषद, नगर पंचायतसाठी शासनाकडून मोठ्याा प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. त्याचे नियोजन करून ओपनस्पेसचा विकास व इतर विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना खा. नेते यांनी दिल्या. नगरोत्थान व वैशिट्येपूर्ण योजनेतून नगर परिषद व नगर पंचायतीचा विकास करण्याचे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व योजनेचा आढावा घेतला.