मदतीचा हात देत त्यांनी दिला माणुसकीचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:25+5:302021-04-30T04:46:25+5:30
(बॉक्स) चंदनखेडीत गरजूंना धान्यवाटप चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी गरीब व गरजूंना धान्यवाटप केले. मागील ...
(बॉक्स)
चंदनखेडीत गरजूंना धान्यवाटप
चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी गरीब व गरजूंना धान्यवाटप केले. मागील वर्षापासून कोरोनाचा कहर आहे. यामुळे लोकांचा रोजगार हिरावला आहे. अशा स्थितीत गरिबांचे हाल हाेऊ नयेत यासाठी चरडे यांनी एक आठवडा पुरेल एवढ्या धान्याचे वाटप केले. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या उदात्त हेतूने आमचे कार्य निरंतर सुरू राहील, असे युवा सामाजिक कार्यकर्ते दौलत आत्राम यांनी सांगितले. उपसरपंच भारत कनाके, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका शेडमाके, बंडू शेडमाके, मोरेश्वर चरडे, गोपीनाथ चौधरी, अरुण शेडमाके, दौलत आत्राम, जोगाजी शेडमाके, अतुल डोके आदींनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
संस्कारकडून वस्तूंचे वाटप
लॉकडाऊनमध्ये सर्व कामे ठप्प पडली. त्यामुळे मजुरीच्या भरवशावर उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध नागरिकांपुढे मोठे संकट ओढवले. त्यांच्यासाठी एटापल्लीतील संस्कार संस्था धावून आली. या संस्थेच्या पुढाकाराने गरजू आणि वृद्ध कुटुंबांना गावातील काही सद्गृहस्थांच्या मदतीने तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. ही सेवा पुढेही सुरूच राहील, असे संस्थेचे अध्यक्ष विजय संस्कार, गणेश ठावरे आणि पूजा संस्कार यांनी सांगितले.
कोविड वॉरिअर्स ग्रुपचा सेवाभाव
कोरोनाच्या संकटकाळात कोरची येथील कोविड केअर सेंटरमध्ये उद्भवणाऱ्या समस्या दूर करून रुग्णांना शक्य ती सर्व सुविधा देण्यासाठी कोरची कोविड वॉरिअर्स ग्रुप तयार करून काही सेवाभावी युवकांनी पुढाकार घेतला आहे. कोरचीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, कर्मचारी, पत्रकार, ग्रामसभेचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्यासह गुप्तदान करणाऱ्या अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला त्यातून रुग्णांना हव्या त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे रुग्णांच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.