दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे ६ दिवसातील सर्व पेपर पहिल्याच दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे स्थगित करण्यात आले होते. आता त्यासाठी नवीन वेळापत्रक बनविण्यात आले असून सोमवार १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आहेत. ही परीक्षा एका दिवशी पाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
गोंडवाना विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या १०५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील २०१२ महाविद्यालयातील १८ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. ज्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणे शक्य नाही, त्या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी ५ ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वेळेवर आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यापीठ प्रशासनाला ११ ऑक्टोबरपर्यंतचे सर्व पेपर रद्द करावे लागले. यादरम्यान विद्यार्थ्यांसह परीक्षा विभागाचा चांगलाच गोंधळ उडाला होता. परीक्षेदरम्यान विद्यापीठाच्या लिंकवर भार पडून सर्व्हर डाऊन झाले. परिणामी ऑनलाईन पेपर सोडवणे शक्य झाले नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नवीन वेळापत्रकानुसार, दररोज पहिला पेपर सकाळी ८.३० वाजता सुरू होऊन शेवटचा (पाचवा) पेपर सायंकाळी ६.३० वाजता संपेल.
९ केंद्रांवर ऑफलाईनज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ऑफलाईन परीक्षेचा पर्याय देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, मालेवाडा, कोरची, जारावंडी, वडधा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण, जांभुळघाट, कनेरी अशा एकूण ९ केंद्रांवर ऑफलाईन परीक्षा १२ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
मॉक टेस्टमधून सरावाची सुविधाविद्यापीठाच्या वतीने या परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची (सराव चाचणी) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मॉक टेस्ट ९ ऑक्टोबरला दुपारी १ वाजतापासून ते १० ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळेत विद्यार्थ्यांना सराव करता येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा सराव करावा, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान कुठलीही अडचण येणार नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांनी म्हटले आहे.