सव्वा लाख निराधारांना शासनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:18+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरूच राहत असल्याने लाभार्थ्यांमध्ये वाढ होत राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अपंग, निराधार, वयोवृध्द नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत अनुदान वितरणाच्या विविध योजना राबविल्या जातात. यातील बहुतांश योजनेंतर्गत मासिक एक हजार रुपये अनुदान दिले जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ६२८ नागरिकांना अनुदान वितरित केले जात आहे.
वृध्दापकाळामध्ये व्यक्तीचा गोळ्या औषधांवरील खर्च वाढतो. दुसरीकडे या वयात काम करणे शक्य होत नसल्याने उत्पन्नाचे पूर्ण स्त्रोत बंद होतात. परिणामी ज्यांचे हात स्वत:ची मुले, समाज व देशाचे भवितव्य घडविण्यासाठी झिजले, अशांना वृध्दापकाळात अतिशय हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. पैशाअभावी परावलंबी जीवन त्यांच्या वाट्यास येते. तसेच अपंग, विधवा महिलांनाही संपूर्ण जीवन संघर्ष करीत जगावे लागते. समाजातील या घटकांना थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत या नागरिकांना मासिक अनुदान वितरित केले जाते. केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवितात. या योजनांमध्ये काही वाटा केंद्र शासन तर काही वाटा शासन राज्य शासन उचलून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरूच राहत असल्याने लाभार्थ्यांमध्ये वाढ होत राहते.
हजार रुपये अनुदानाने निराधारांमध्ये आनंद
मागील अनेक वर्षांपासून केवळ ६०० रुपये मासिक अनुदान दिले जात होते. वाढत्या महागाईमध्ये सदर अनुदान अतिशय कमी असल्याने अनुदान वाढवावे, अशी मागणी निराधार नागरिकांकडून केली जात होती. राज्य शासनाकडून २० आॅगस्ट २०१९ रोजी नवीन शासन निर्णय काढून सर्व योजनांतर्गतच्या निराधार व वृध्द नागरिकांचे अनुदान एक हजार रुपये केले आहे. ऑगस्टमध्ये निर्णय घेतला तरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काही नागरिकांच्या खात्यावर ६०० रुपये जमा झाले होते. त्यामुळे शासन वाढीव अनुदान देणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र डिसेंबर महिन्यात ज्या नागरिकांना अनुदान मिळाले आहे, त्यांना एक हजार रुपये प्रतीमाह अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानात वाढ झाल्याने निराधार व वृध्द नागरिकांच्या चेहºयावर आनंद दिसून येत आहे.