एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. व्ही. शेंडे, सरपंच हरिदास टेकाम व कंत्राटदार रमेश रामगोनवार, आर. व्ही. शेट्टे यांच्यावर २५ लाख रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी जारावंडी पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी भादंविचे कलम ४०८, ४०९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०१२-१३ या वर्षी जारावंडी येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेकरिता ४७ लाख रूपये मंजूर झाले होते. मात्र नळ योजनेच्या कामाची सुरूवात न करता, २५ लाख रूपयांचे धनादेश ग्रामसेवक आर. व्ही. शेंडे, सरपंच हरिदास टेकाम यांच्या संगनमताने संबंधीत कंत्राटदारांना देण्यात आले. प्रत्यक्षात एकाही लाखाचे काम न करता, संपूर्ण काम अर्धवट ठेवण्यात आले. यासंदर्भात अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल तब्बल १ वर्षांनी घेण्यात आली असून चौकशी करण्यात आली. मात्र एकाही दोषींवर कारवाई न झाल्याने अखेर १५ आॅगस्ट २०१४ रोजी उपसरपंच देवनाथ सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली. या सभेत २५ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी सरपंच हरिदास टेकाम, ग्रामसेवक आर. व्ही. शेंडे, कंत्राटदार रमेश रामगोनवार, आर. व्ही. शेट्टे यांच्याविरूद्ध कारवाईचा ठराव पारीत करण्यात आला. त्यानंतर या ठरावानुसार उपसरपंच देवनाथ सोनुले यांनी चारही जणांविरूद्ध जारावंडी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती पाठवून या गैरव्यवहाराची चौकशी केली व जारावंडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने या गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्याने जारावंडी पोलिसांनी चौकशी करून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गैरव्यवहाराबाबत गावकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. दोन वर्षानंतर यश मिळाले. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: November 15, 2014 10:47 PM