गडचिरोली : लाचलुचपत प्रकरणात तक्रार करून आवश्यक सर्व सहकार्य केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्यावतीने आज १ नोव्हेंबर रोजी शनिवारला कार्यालयात ६ तक्रारकर्त्या नागरिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक डी. डब्ल्यू मंडलवार, पोलीस निरिक्षक एम. एस. टेकाम, सहायक पोलीस निरिक्षक मोरेश्वर लाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते हर्षेंद्र गजानन मिश्रा रा. गडचिरोली, इरशाद हिदायतुला पठाण रा. सातपुती (कोरची), गंगाधर धर्मा शेडमाके रा. वेलगूर (चामोर्शी), राकेश लक्ष्मणराव पारटवार रा. बेडगाव (कोरची), तुकाराम कानू गांधरवार रा. राखी गुरवळा, विवेक बलराम खेवले रा. वडधा (आरमोरी) यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरिक्षक डी. डब्ल्यू मंडलवार यांनी यंदा १० महिन्यात १४ सापळे रचून लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. हर्षेंद्र मिश्रा यांनी तक्रार करून सहकार्य केल्याबद्दल अवैध प्लाटची अकृषक गुंठेवारीच्या प्रकरणात आरोपी अव्वल कारकून भगिरथ झुरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात यश आले. इरशाद पठाण यांच्या तक्रारीवरून नाली बांधकाम देयके मंजूर करण्याच्या प्रकरणात पं.स. विस्तार अधिकारी अशोक परशुरामकर यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात यश आले. गंगाधर शेडमाके यांच्या तक्रारीवरून पं.स. कृषी अधिकारी युवराज लाकडे यांना बैलबंडी मंजूर करून देण्याच्या प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले, असे पोलीस निरिक्षक मंडलवार यांनी यावेळी सांगितले. सत्कार कार्यक्रमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलीस नाईक परिमल महानंद बाला, वसंत जौजाळकर, रविंद्र कत्रोजवार, पोलीस शिपाइ नरेश आलाम, मिलिंद गेडाम, चालक पोलीस शिपाई घनश्याम वडेट्टीवार यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
एसीबीतर्फे तक्रारकर्त्या नागरिकांचा गौरव
By admin | Published: November 01, 2014 10:52 PM